ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचे दगड निखळ्याने वाहतुकीसाठी बंद
आमदार नारायण पाटील यांच्याकडून पुलाची पाहणी
वाशिंबे(कटूसत्य वृत्त):- पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन कोंढार चिंचोली-डिकसळ पुलाचे दगड निखळल्याने आणि एका बाजूने पूल ढासळल्याने आज (२५ जुलै २०२५) सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील सर्व वाहतूक बंद केली आहे. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये याच पुलाचे भरावाचे दगड निसटले होते, तेव्हा जड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, नंतर पुन्हा जड वाहने सुरू झाल्याने पुलाची अवस्था आणखी खराब झाली.
आज सकाळी पुलाच्या कमानीचे दगड कोसळल्याने भगदाड पडले, ज्यामुळे प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून पूल बंद केला. पुलाच्या दोन्ही बाजूंना जेसीबी यंत्राने खणून वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. स्थानिक आणि प्रवाशांनी प्रशासनाकडून त्वरित दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीची मागणी केली आहे, कारण या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने करमाळा तालुक्यातील भिगवण- बारामती ला शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.दैनंदिन कामासाठी शेतकरी मासेमारी, व्यापाऱ्यांना जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढला आहे.
नदिवरील नवीन पूल मंजूर आहे. जुन्या पुलाचे ऑडिट शासनाने केले आहे.अधिवेशनात आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे उजनी जलाशयवरील ब्रिटिशकालीन पुल बांधणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा अशी मागणी केलेली आहे.
- नारायण पाटील, (आमदार करमाळा)
१५० वर्षांंहून अधिक काळ पाण्यात उभा असलेला ब्रिटिशकालीन पुल आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासनाने दखल घेऊन नवीन पुलाचे काम जलदगतीने होण्यासाठी लक्ष द्यावे.
- संभाजी भोसले ( जिंती )
0 Comments