शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाचा सेनापती बदलला, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळलं होतं. यानंतर आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत अखेर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे.
जयंत पाटील गेल्या 7 वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष होते. 2018 साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. जयंत पाटील यांनी पदभार हाती घेताच सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला होता. राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली होती. विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचे काम या कालखंडात केले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही पक्षाकडून त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. यानंतर आता अखेर पक्षाकडून प्रदेशाध्यपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
शशिकांत शिंदे कोण आहेत?
शशिकांत शिंदे हे नेहमीच शरद पवार यांच्या जवळचे नेते मानले जात होते. शशिकांत शिंदे यांना अनेक वर्षांपासूनचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे. ते अनेक वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहेत. त्यांचा अनुभव पाहता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ते योग्य ठरतील, अशी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भूमिका होती. याशिवाय शरद पवार यांच्यासोबतची त्यांची एकनिष्ठता देखील महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. एका गटाने सत्ताधारी पक्षासोबत युती केली. पण शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी पक्षात न जाता शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं पसंत केलं. यानंतर आता त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
शशिकांत शिंदे यांची माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळख आहे. त्यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा जावळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा 12 हजार मतांनी विजय झाला होता. तसेच ते 2009 ते 2014 या काळात कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी चक्क शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. ते कोरेगाव सह जावळी मतदारसंघाचे प्रत्येकी दोन वेळा आमदार राहिले आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली होती. पण या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोरेगावमध्ये देखील महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. शशिकांत शिंदे हे सध्या शरद पवार यांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच ते पक्षाचे मुख्य प्रतोद देखील आहेत.
0 Comments