Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार- खा. धैर्यशील मोहिते पाटील

 सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार- खा. धैर्यशील मोहिते पाटील





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यांची फळी होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात काम केले जात होते. ज्येष्ठ नेत्यांनी सहकारातून जिल्ह्याचा विकास केला होता; मात्र सध्या जिल्ह्याला आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने प्रशासकीय व सहकाराची घडी विस्कटली असल्याची खंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कासेगाव येथील वसंत नाना देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे वसंत नाना यांचा कासेगाव येथे ग्रामस्थ वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी नेते अनिल सावंत व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार मोहिते पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील, दिगंबर बागल, कै. गणपतराव देशमुख, सुधाकरपंत परिचारक तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, दिलीप सोपल, लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासारखे दिग्गज नेते यांनी सोलापूर जिल्ह्यात चांगल्याप्रकारे विकास केला होता. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी त्यांनी सहकार चळवळ उभी केली. या माध्यमातून साखर कारखाने दूध संस्था उभ्या केल्या. यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.

ज्येष्ठ नेते काम करत असताना शासकीय दरबारी सरपंचालाही मान होता. मात्र, सध्या सोलापूर जिल्ह्याला आपला जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने विविध कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासकीय व सहकारातील घडी विस्कटली आहे. सरपंचाला मान मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर ठेकेदार मालामाल झाले असून त्यांच्या इशाराने अधिकारी काम करत असल्याचे पहावयास मिळत आहे. एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय सहकाराची घडी विस्कटली असल्यामुळे खासदार मोहिते पाटील यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी कासेगाव ग्रामपंचायततर्फे प्रत्येक घरात कलमी आंब्याचे एक झाड, दोन कचराकुंडी तसेच गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आली. यावेळी नागेश फाटे, अनिल सावंत, अमर पाटील, दीपक वाडदेकर, सुरेश कट्टे यांच्यासह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातून राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व कासेगावमधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments