माढा तालुक्यातील पाझर तलाव भरून घेण्यासाठी लवकरच पाणी सुटणार- आ. अभिजीत पाटील
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील उजनी जलाशयामध्ये सध्या ७०% पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या पाऊसमान लवकरच सुरू झालेला असून भरपूर पाऊस अपेक्षित आहे. उजनी धरणाच्या पुर्व भागातील धरणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालु असून त्याचेही पाणी उजनी धरणामध्ये येणार असल्यामुळे पुढील कालावधीमध्ये उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणे अपेक्षित आहे. सदर धरणामध्ये पाऊसकाळात भिमा नदीमध्ये पाणी सोडावे लागल्यास भिमा नदीला पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सदरची पुरस्थिती निर्माण होऊ नये, त्यासाठी सद्यःस्थितीला यावर उपाय-योजना करणे गरजेचे आहे. त्याकरिता उजनी धरणातून सिना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये पाणी सोडून त्याचबरोबर उजनी धरणावर अवलंबून असणारे सर्व पाझर तलाव व जलसाठे पुर्ण क्षमतेने भरून घेतल्यास तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना त्याचा चांगला फायदा होऊन संभाव्य पुरस्थितीही टळेल.
उजनी धरणातून सिना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये पाणी सोडून त्याचबरोबर उजनी धरणावर अवलंबून असणारे सर्व पाझर तलाव व जलसाठे पुर्ण क्षमतेने भरून घेणेकामी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आमदार पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे तसेच त्या बाबतीत आमदार अभिजीत पाटील पूर्णपणे प्रयत्नशील असून काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर हे पाणी येत्या दोन-तीन दिवसात सीना माढा उपसा सिंचन योजनेतून सुटेल अशा आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले. माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरून निघतील व पुढील हंगामाचा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 Comments