पावसाची विश्रांती; बळीराजा हवालदिल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 25, 2025

पावसाची विश्रांती; बळीराजा हवालदिल

 पावसाची विश्रांती; बळीराजा हवालदिल



शावळ (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या कर्नाटकच्या सीमावर्ती भागात यंदाच्या खरीप हंगामात काळ्या आईची ओटी भरण्यापूर्वीच पावसाने सध्या विश्रांती घेतल्याने या परिसरातील बळीराजा हवालदिल बनला आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत चातकाप्रमाणे आभाळाकडे नजरा लावून बसला आहे.


यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने ऐन खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या वेळेतच जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाला. ज्या शेतकऱ्यांकडे बैलबारदाना नाही, अशांनी ट्रॅकरद्वारे पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली. मात्र, सीमावर्ती परिसरातील तडवळ, करजगी, मंगरूळ, म्हेसलगी देवीकवठा, घुंगरेगाव, गौडगाव बु।।, नाविंदगी, आंदेवाडी तसेच इंडी, अफझलपूर तालुक्यातील शेषगिरी, मणूर, गुब्याड, अगरखेड, होसूर आदी गावातील शेतकऱ्यांनी घाईघाईने तूर, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदींची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. त्यानंतर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने हजेरी न लावल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.


सध्याची संचित ओल उत्तम  वाफसा स्थितीत सोयाबीन, उडीद, मूग, तूर पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.


सध्या जोरदार वाहणारा वारा व कडक ऊन यामुळे जमिनीवरचा मातीचा थर सुकत आहे. त्यामुळे लवकर केलेली पेरणी दगा देण्याची शक्यता असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. मृग नक्षत्राने दगा दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत.


तालुक्यातील सीमावर्ती भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात महागडी बी-बियाणे खरेदी करून मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील विविध नगदी पिकांची पेरणी केली आहे.


आणखी आठवडाभर पाऊस न झाल्यास ही पिके धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट घोंगावत असल्याचे दिसून येत आहे.


चौकट 

दुरुस्तीची कामे जोमात

सध्या पावसाने उघडीप दिल्याने ज्या शेतकन्यांकडे बैलबारदाना आहे, अशा शेतकऱ्यांनी कुळवण, तिफण, इतर शेती अवजारे दुरुस्त करून घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सुताराच्या मेटावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सर्वांनाच आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages