हुंडा विरोधात मराठा समाजाचा निर्णय स्तुत्य; इतर समाजांनीही अनुकरण करावे – ॲड.चव्हाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

हुंडा विरोधात मराठा समाजाचा निर्णय स्तुत्य; इतर समाजांनीही अनुकरण करावे – ॲड.चव्हाण

 हुंडा विरोधात मराठा समाजाचा निर्णय स्तुत्य; इतर समाजांनीही अनुकरण करावे – ॲड.चव्हाण

पुणे (कटूसत्य वृत्त):- "पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या हुंड्याच्या कारणावरून झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण समाजाला हादरवून टाकलं आहे. यातून बोध घेत मराठा समाजाने विवाह आचारसंहिता आखली ही स्वागतार्ह गोष्ट आहे. समाजाने आता हुंडा, अनावश्यक खर्च आणि प्रतिष्ठेच्या बेड्या झुगारून आदर्श बदल घडवण्यासाठी एकत्र यायला हवं," अशी ठाम भूमिका मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. शंकर चव्हाण यांनी मांडली. चव्हाण म्हणाले की, "मराठा समाजाने विवाहातील अनावश्यक प्रदर्शन, हुंडा, डीजे नाच, मानपान यासारख्या जुनाट आणि अपप्रथा थांबवण्यासाठी जे ठोस निर्णय घेतलेत, त्याचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. समाजाने विवाह समारंभ अधिक साधा, शिस्तबद्ध आणि सन्मानजनक करण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत. हे फक्त मराठा नव्हे, तर सर्वच समाजांसाठी आदर्शवजा आहे."या नव्या आचारसंहितेमुळे विवाह खर्चात कपात होणार, मुलींच्या हक्कांचे रक्षण होणार आणि नवदांपत्याच्या भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आता वेळ आली आहे की प्रत्येक समाजाने हुंड्याविरोधात उभं राहून कुटुंबप्रथांवर पुनर्विचार करावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठा समाजाच्या नव्या निर्णयानुसार, हुंडा घेणाऱ्या कुटुंबांशी सामाजिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. विवाहात अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम वधू-वराच्या भविष्यासाठी एफडीमध्ये गुंतवली जाणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. डीजे नाच, फटाके, प्री-वेडिंग शूट्स, मानपान यावर निर्बंध घातले आहेत.
याविषयी बोलताना ॲड. शंकर चव्हाण म्हणाले, “या निर्णयामुळे सामाजिक मानसिकतेत परिवर्तन होईल आणि विवाह म्हणजे प्रतिष्ठेचं प्रदर्शन नव्हे, तर दोन कुटुंबांचा जबाबदारीने उभा केलेला संसार असेल, ही भावना रूजेल.”शेवटी, चव्हाण यांनी राज्य सरकार आणि इतर समाजांना आवाहन केलं की, “अशा आदर्श आचारसंहितेचा विचार करून महिलांच्या सन्मान आणि सुरक्षित भविष्यासाठी कायद्याचे आणि समाजशास्त्राचे उत्तम उदाहरण घडवावं.”

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages