अक्कलकोट नगरपरिषदेत आता २३ ऐवजी २५ सदस्य असणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

अक्कलकोट नगरपरिषदेत आता २३ ऐवजी २५ सदस्य असणार

 अक्कलकोट नगरपरिषदेत आता २३ ऐवजी २५ सदस्य असणार


अक्कलकोट(काटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने नुकतेच नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले असून अक्कलकोट नगरपरिषदेच्या नव्या प्रभाग रचनेत आता २३ ऐवजी २५ नगरसेवक असणार आहेत. नव्याने एक प्रभाग वाढणार असून २०२२ ची प्रभाग रचना मात्र कायम राहणार आहे.


अक्कलकोट नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीवरून प्रशासकीय व राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागरिकांचेही प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीतील गणिते ही नव्याने वाढलेल्या प्रभागावर अवलंबून राहणार आहेत.


अक्कलकोट नगरपरिषदेत २०१६ मधील प्रभाग रचनेनुसार एकूण ११ प्रभाग होते. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक याप्रमाणे व शेवटच्या प्रभागात तीन असे एकूण २३ नगरसेवक होते. याशिवाय २ स्वीकृत नगरसेवक आणि जनतेतून थेट निवडलेला एक नगराध्यक्ष अशी मिळून नगरपरिषदेच्या सदस्यांची एकूण संख्या २६ अशी होती. त्यावेळी एका प्रभागातील सरासरी


मतदार संख्या १७०० ते १८०० होती. २०२२ मध्ये नवीन प्रभाग रचना करण्यात आली होती व त्यास जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळाली होती. मात्र, ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट झाल्याने निवडणुकाच झाल्या नाहीत. वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता सर्वोच्च न्यायालयाने

चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश  दिल्याने शासनाने नव्याने प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. मात्र, अक्कलकोट नगरपरिषदेत २०२२ प्रमाणेच सदस्य असणार असून प्रभाग मात्र एकने वाढणार आहे.


नव्या रचनेत जुन्या प्रभागांचे विभाजन होणार असून एकूण प्रभागांची संख्या, नगरसेवकांचे प्रमाण व वॉर्डनिहाय सीमारेषा नव्याने निश्चित होणार आहेत. मतदारसंख्या आणि वस्ती नकाशा लक्षात घेता अनेक जुन्या प्रभागांचे विभाजन किंवा एकत्रिकरण होण्याची शक्यता आहे. यामुळे काही इच्छुकांच्या आशेवर पाणी पडणार आहे.


राजकीयदृष्ट्या अक्कलकोट-मध्ये दोन प्रमुख गट आहेत. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरत असते. आता माजी मंत्री म्हेत्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले असून भाजपची शिंदेसेनेसोबत युती

आहे. तसेच काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मल्लिकार्जुन पाटील, अश्पाक बळोरगी हे काँग्रेसमध्येच थांबले

आहेत. वंचित बहुजन आघाडी, मनसे, आरपीआय, शिवसेना उबाठा पक्षाचे नेतेही सक्रिय झाले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षात आघाडी होते का हे पाहावे लागणार आहे. नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे.


चौकट 

१२ प्रभाग असणार

प्रभाग रचना प्रसिध्द होत नाही, तोपर्यंत ती गोपनीय असेल. अक्कलकोट नगरपरिषदेत २५ सदस्य असतील. प्रत्येकी २ सदस्य असणारे ११ प्रभाग व ३ सदस्य असणारा १ प्रभाग असे एकूण १२ प्रभाग असतील, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.


चौकट 

२०१६ मधील पक्षीय बलाबल

भाजप नगराध्यक्षांसह..........................१६ 

काँग्रेस...............................................६ 

राष्ट्रवादी.............................................१

अपक्ष.................................................१

एकूण.................................................२४

नगरपरिषद प्रभाग रचनेचे वेळापत्रक

■ प्रगणक गटाची मांडणी करणे ११ ते १६ जून

■ प्रारूप प्रभाग रचना तयार करणे १७ ते १८ जून

■ स्थळ पाहणी १९ ते २३ जून

■ गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे २४ ते २६ जून

■ निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी तपासणे १ जुलै ते ३ जुलै

■  प्रारूप प्रभाग रचना तयार करणे ४ ते ७ जुलै

■ प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करणे व हरकती २२ ते ३१ जुलै

■ हरकतींवर सुनावणी १ ते ११ ऑगस्ट

■ निवडणूक आयोगास पाठविणे १२ ते १८ ऑगस्ट

■ अंतिम प्रभाग रचना प्रसिध्दी २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages