बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हर फ्ल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हर फ्ल

 बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हर फ्ल



वैराग (काटूसत्य वृत्त):-  मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे व मान्सून पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पनुकताच ओव्हर फ्लो होऊन वाहू लागला आहे. वैराग भागाची तहान भागवणारा हिंगणी ९२ टक्के तर जवळगाव मध्यम प्रकल्प ५५ टक्के भरला आहे. भोगावती, नागझरी, नीलकंठ नद्या सध्या जोरात वाहू लागल्या आहेत. त्यामुळे राहिलेली दोन्ही धरणे मोठा पाऊस झाल्यास लवकरच भरणार आहेत.


या धरणांतील पाण्याचा लाभ वैराग भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. गेल्या काही दिवसात संततधार व दमदार पडणाऱ्या पावसामुळे प्रकल्पांतील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.


ढाळे. पिंपळगाव मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ४४७ द.ल.घ.फू. असून मृतसाठा २.८० द.ल.घ.फू. इतका आहे. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरून ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. धरणातील पाण्याचा लाभ या भागातील ढाळे पिंपळगाव, महागाव, मळेगाव, बावी, तांदूळवाडी, साकत, पानगाव, कळंबवाडी, पिंपरी, काळेगाव, घाणेगाव, चिखर्डे या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासाठी

होणार आहे. या धरण क्षेत्र परिसरात हजारो एकर बागायती क्षेत्र वाढले असून द्राक्षबागा, ऊसशेती, सीताफळ, लिंबोणी तसेच इतर बागायती व जिरायती पिकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे.


धाराशिव, तुळजापूर व वैराग भागात गेल्या काही दिवसात दमदार व संततधार पाऊस झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असणाऱ्या हिंगणी व जवळगाव मध्यम प्रकल्पामधील पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडला तर दोन्ही प्रकल्प लवकरच भरतील. हिंगणी मध्यम प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता १६०७ द.ल.घ.फू. इतकी असून मृतसाठा पाणीपातळी ४७८ द.ल.घ.फू. आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ९२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

तर जवळगाव मध्यम प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता १२०० द.ल.घ.फू. इतकी असून मृतसाठा पाणी पातळी २०० द.ल.घ.फू. इतकी आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ५५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या हिंगणी व जवळगाव मध्यम प्रकल्प धरण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने व दोन्ही नद्या वाहत असल्याने लवकरच हे मध्यम प्रकल्पदेखील भरतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.


भोगावती नदीवरील असणारे हिंगणी मध्यम प्रकल्प व नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प जनसामान्यांसाठी संजीवनी ठरले आहेत. दोन्ही प्रकल्पातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.


चौकट 

बार्शी तालुक्यातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे

१५ जून रोजी सकाळपासून बार्शी तालुक्यातील घाणेगाव, इलें, तडवळे, देगाव, डिसकळ, भोईरे हे लघू पाणलोट तलाव भरून वाहत आहेत. तर ममदापूर-६० टक्के, गोरमाळे-५३ टक्के, कारी- ६१ टक्के, वैराग- १०० टक्के, तावडी- ६२ टक्के, कळंबवाडी- १९ टक्के, चारे- ३२ टक्के, वालवड - ०२ टक्के, लाटेगाव- २० टक्के, कोरेगाव- ३२ टक्के, पाथरी- २९ टक्के, शेलगाव- २३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.


चौकट 

नागरिकांनी दक्षता घ्यावी

सध्या मान्सून पाऊस सुरू असून यावर्षी प्रथमच मध्यम प्रकल्प लवकर भरत आहेत. नदी व धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन बार्शी पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता विराज परदेशी यांनी केले आहे..


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages