सासवड येथे दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट व्यक्ती उभी करून दस्त नोंद
पुणे (कटूसत्य वृत्त):- सासवड येथील नोंदणी कार्यालयात दस्त क्र. २५०१/२०२५ व २५०२/२०२५ हे दस्त बनावट व्यक्ती उभी करून नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकाराच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नोंदणी उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, सदर प्रकरणात काही व्यक्तींनी संगनमत करून खोटे दस्त तयार करून, बनावट व्यक्ती उभी करून दस्त नोंदणी केली आहे. अश्याच पद्धतीचे बेकायदेशीर दस्त केवळ पुण्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात नोंदवले जात असल्याचे वारंवार समोर येत आहेत. 'वन डिस्ट्रीक्ट – वन रजिस्ट्रेशन' योजनेचा गैरफायदा घेत काही व्यक्ती दुसऱ्या तालुक्यात जाऊन फसवणूक करत आहेत. उदाहरणार्थ, भोर तालुक्यातील जमिनीचा दस्त तळेगाव ढमढेरे येथे नोंदवला जातो आणि यामध्ये मूळ मालकाच्या नकळत खोटी विक्री केली जाते.
अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे सामान्य नागरिकांची आयुष्यभराची संपत्ती गमावण्याचा धोका निर्माण होतो. एकदा बोगस दस्त नोंदला गेल्यानंतर, मूळ मालकाला न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागतो. यामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रासास त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते.
सूरवसे पाटील यांनी ही बाब नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांना भेटून निवेदनाद्वारे लक्षात आणून दिली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. असे नोंदणी महानिरीक्षक म्हणाले. तसेच, उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अंतर्गत चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारांची तक्रार आमच्या निदर्शनास येत असून, सर्व नोंदणी कार्यालयांची चौकशी केली जाईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
नोंदणी विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व अश्या बेकायदेशीर प्रकाराला आळा घालावा. हीच स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेची ठाम मागणी आहे.
- रोहन सुरवसे-पाटील
अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड संघटना
0 Comments