Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यापीठाकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण!

 विद्यापीठाकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण!



अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या कामासाठी २५ मेपर्यंत डेडलाईन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी लोकार्पण करण्याचे नियोजित आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने स्मारक परिसरातील काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २५ मेपर्यंत डेडलाईन दिली आहे.
विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसमोरील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळा परिसरात सध्या कोरीव काम सुरू आहे. त्यामागे मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर १५० फुटाचा (५० मीटर उंच) वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. याशिवाय अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी म्हणून त्याठिकाणी विविध चित्रे देखील असणार आहेत. या कामासाठी १४ कोटींचा निधी मंजूर असून त्यापैकी साडेसहा ते सात कोटी निधी अजून आलेला नाही. ३१ मे जवळ येत असल्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण मुदतीत सर्व कामे होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्त्यासाठी लागू शकतो विलंब
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हिरज रोडवरील ३८२ एकर जमिनीवर भव्य प्रशासकीय इमारत उभारली आहे. त्याच ठिकाणी परीक्षा भवन देखील असेल. आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज तेथूनच सुरू होईल. तत्पूर्वी, ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी जाण्यासाठी दोन रस्ते प्रस्तावित असून त्यातील एका रस्त्याचा विषय मार्गी लागला, पण दुसऱ्या रस्त्याचा सर्व्हे अजून सुरू झालेला नाही. सर्व्हे होऊन जमीन संपादित करणे, त्यासाठी निधी मंजूर करून घेणे आणि रस्ता करणे, या कामांसाठी वेळ लागू शकतो, असे अधिकारी सांगत आहेत.
चौकट
दुसऱ्या रस्त्याचे काम वेळेत अपेक्षित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी विद्यापीठाकडून मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. तत्पूर्वी, हिरज ते नवीन प्रशासकीय इमारत आणि सोलापूर-पुणे महामार्ग ते नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत रस्ता केला जाणार आहे. हिरज रस्ता ते नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंतचा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केला जाणार असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दुसऱ्या रस्त्याचेही काम काही दिवसांत अपेक्षित आहे.
- अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ


Reactions

Post a Comment

0 Comments