वळवाच्या पावसाने बार्शीत पिकांचे नुकसान
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यात पडलेल्या पावसाने तालुक्यातील अनेक गावांत शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील भातंबरे येथील बाळासाहेब सोपान झोंबाडे यांच्या शेतातील एक एकर मिरची पीक पूर्णपणे पाण्यात जाऊन मोठे नुकसान झाले आहे.
शेतामधील माती वाहून गेली असल्यामुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांमधून होत आहे.
उपळाई (ठो) येथेही ढगफुटीसद़ृश झाल्याने शेताला तळ्याचे व रस्त्याला कॅनालचे स्वरूप प्राप्त झाले होते. येथील संतोष पाटील या शेतकर्याने पर्जन्याचे मोजमाप केले असता, पर्जन्य मापकामध्ये 131 मिली नोंद आढळून आली. सुमारे दोनच तासात एवढा मोठा पाऊस मे महिन्यात पहिल्यांदा पडल्याचे वयस्कर शेतकरी सांगत होते. पडलेल्या पावसामुळे नवीन छाटणी केलेल्या द्राक्ष बागा, केळी, पपई, टोमॅटो ऊस भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
रमेश पाटील यांची अंबा पिकाची झाडे ही वादळामुळे उपटून पडली आहेत. खराडे यांच्या टोमॅटो पिकाचे ही नुकसान झाले तरी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनच्या निकषाप्रमाणे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच मधुकर वैध, उप सरपंच मीनल ठोंगे यांच्यासह शेतकर्यांनी केली आहे.
कांदलगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने नदीला पूर आला होता शेतामध्ये तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते तसेच पावसाने अनेक शेतकर्यांच्या शेतातील माती वाहून गेले आहे. शेतातील तालीही फुटून मोठी हानी झालेली आहे. बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथे मुसळधार पावसामुळे माजी उपसरपंच चेतन अशोक शिंदे यांची 60 फूट विहीर पूर्णपणे बुजून गेली आहे. जमिनीच्या समांतर ही विहिर भरली आहे. अतिवृष्टी सदृश्य झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कोरफळे ते श्रीपतपिंपरी दरम्यान सुरू असलेले खडीकरणाचे काम वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
0 Comments