सोलापुर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-या वर्षीचा मॉन्सून २७ मे रोजी केरळ किनारपट्टीवर पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यापूर्वीच कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात ठिकठिकाणी ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे पाऊस धो-धो पडू लागला आहे.
सोलापूर शेजारी असलेल्या जिल्ह्यात अवकाळीची जोरदार हजेरी असताना सोलापूर जिल्ह्यातही कोकणासारखा दमटपणा आणि किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस हजेरी लावू लागला आहे.
या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळतो तर अवकाळीनंतर परत उकाडा वाढत असल्याचा अनुभव येऊ लागला आहे. सध्या शेतात असलेल्या मका, कांदा, भूईमूग या पिकांना तर द्राक्ष, आंबा व डाळिंबासाठी अवकाळी, वादळी वारे नूकसानदायक मानले जात आहे. आज सोलापुरात ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज आर्द्रतेची टक्केवारी ६४ होती. रविवारी रात्रीपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. आज दिवसभरात सायंकाळी ५.३० पर्यंत १.३ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.
रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे या आठवड्यात देखील सोलापुरच्या तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरीही उकाडा आणि दमटपणा वाढला आहे. सोलापुरात दमट वातावरण आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू झाला. बोरगाव (ता. अक्कलकोट) येथे वीज पडून बैल ठार झाला तर वीज पडून एका खिलार गायीचा मृत्यू झाल्याची घटना शेटफळ (ता. मोहोळ) येथे घडली.
दोन दिवस राहणार वाऱ्याचा वेग
सोलापूर शहर व परिसरात वाऱ्याचा वेग वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दोन दिवसात वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितास या प्रमाणे राहील, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण राहिल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
0 Comments