Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवरायांच्या पुतळा मजबुतीकरणाचे काम संथगतीने

 शिवरायांच्या पुतळा मजबुतीकरणाचे काम संथगतीने


शिवप्रेमी नाराज; महानगरपालिकेस १५ मे पर्यंतची अंतिम डेडलाईन
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मजबुतीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठी नाराजी आहे. छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन १५ मे अंतिम डेडलाईन दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडून सध्या स्कॅनिंग काम पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून हे काम सुरू आहे. काम पूर्ण करण्यासाठी पुतळा बंदिस्त ठेवला गेला आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करत असताना या मोठ्या अडचणीचा सामना मध्यवर्ती महामंडळाला करावा लागला होता. गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी होती. पुण्यतिथी दिवशीदेखील बंदिस्त पुतळ्यामुळे महाराजांना अभिवादन करता आले नाही. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनास जाब विचारण्यासाठी शिवजन्मोत्सव छत्रपती मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण नाही झाल्यास गंभीर परिणाम महापालिका प्रशासनास भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, श्रीकांत डांगे, ज्ञानेश्वर
सपाटे, तात्या वाघमोडे, गणेश डोंगरे, श्रीकांत घाडगे, प्रकाश सोनवणे, विजय भोईटे, विश्वनाथ गायकवाड, सचिन स्वामी, देविदास घुले, नागेश वडणे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
चौकट 1
१९ फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. काम पूर्ण झाले नाही, तरीही शिवभक्तांनी सामंजस्याने शिवजयंती साजरी केली. शिवप्रेमींचा अंत किती दिवस पाहणार आहात. किती दिवस महाराजांना बंदिस्त ठेवणार आहात. दिलेल्या वेळेत काम पूर्ण नाही झाल्यास शिवप्रेमी तीव्र आंदोलन करतील.
- श्रीकांत डांगे,
सदस्य, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ

Reactions

Post a Comment

0 Comments