वळसंगकर हॉस्पिटलबाबत मनीषा मानेंचे अनेक गौप्यस्फोट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेली वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. डॉ वळसंगकरांच्या हाती हॉस्पिटलमधील फक्त ओपीडीचे अधिकार ठेवण्यात आले होते. सर्व व्यवहार हा मुलगा आणि सुनेच्या हाती होता. मात्र, सून आणि मुलामधील वादाचा फटका रुग्णालयाला बसू नये म्हणून अलीकडे डॉ. वळसंगकर यांची हॉस्टिलमध्ये ये-जा वाढली होती. पण, डॉक्टरांचा हस्तक्षेप दोघांनाही मान्य नव्हता, त्यामुळेच काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉ अश्विन आणि डॉ सोनाली हे एकत्र आले होते, असे मनीषाने म्हटल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी वळसंगकर हॉस्पिटलची सुरुवात केली होती, त्यांनीच रुग्णालयाची उभारणी करून ते नावारूपाला आणले होते. त्याच डॉ. शिरीष वळसंगकर यांना स्वकीयांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. जवळची व्यक्ती त्यांच्या अंगावर तीनवेळा धावून गेली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या हाती हॉस्पिटमधील अधिकार नाममात्रच होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शब्दाला शून्य किंमत होती. बिल कमी करण्याचेही अधिकार त्यांची हाती नव्हते, त्यामुळे त्यांनीच उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये डॉ वळसंगकर यांची कोंडी केली जात होती, असे मनीषा मुसळे माने हिने चौकशीत नमूद केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
डॉ. वळसंगकर यांची सून शोनाली वळसंगकर ह्या न्यूरो सर्जन होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे रुग्णांची संख्या अधिक असायची. त्यांचा मुलगा डॉ. अश्विन वळसंगकर यांचेही स्वतंत्र रुग्ण असायचे, त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाचे बिल ते ते घ्यायचे. माझ्याकडे रुग्णालयातील केवळ वेल्फेअरचे काम होते. हॉस्पिटलला लागणाऱ्या वस्तू डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सहीने मी त्या मागवत होते. वळसंगकर हॉस्पिटलमधील तब्बल ५० टक्के अधिकार देऊनही सून शोनाली ह्यांना डॉ. शिरीष वळसंगकर यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता, असेही मनीषाने पोलिस चौकशीत सांगितल्याचे समोर आले आहे.
डॉ.शोनाली ह्या घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेत होत्या, त्यामुळे सून शोनाली आणि मुलगा डॉ अश्विन यांच्यात वाद होते. त्या वादाचा रुग्णालयावर परिणाम होऊ नये म्हणून डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. मात्र, ते मुलगा आणि सून दोघांनाही आवडत नव्हते. त्यातूनच वेगवेगळे राहणारे सून आणि मुलगा पुन्हा एकत्र आले होते.
मनीषा मुसळे माने हिने पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. मात्र, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. आता डॉक्टरांच्या सीडीआरमधूनच धागेदोरे हाती लागतील, अशी पोलिसांनी अपेक्षा आहे.
0 Comments