ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ३०५ वीजग्राहकांना मिळाले स्मार्टफोन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त वीजग्राहक दरमहा ऑनलाईन वीजबिल भरतात. ऑनलाईनचा हा टक्का वाढविण्याच्या हेतुने महावितरणने ‘लकी डिजीटल ग्राहक योजना’ जाहीर केली होती. ७ एप्रिल रोजी या योजनेची पहिली सोडत (ड्रॉ) जाहीर झाली. यामध्ये बारामती परिमंडलातील ३०५ ग्राहकांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच अशी बक्षिसे मिळाली असून, प्रत्येक उपविभाग पातळीवर विजेत्या ग्राहकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले आहे. पुढील दुसरी सोडत ७ मे रोजी होणार आहे.
बारामती परिमंडलात बारामती, सोलापूर व सातारा अशी तीन मंडल कार्यालये तर त्या अंतर्गत १३ विभाग, ६१ उपविभागीय कार्यालये आहेत. ज्यांनी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षभरात ऑनलाईन वीजबिल भरलेले नाही अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत ही योजना सुरु असून, सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना ‘लकी डिजीटल योजनेचा’ लाभ मिळणार आहे. विजेत्यांची नावे ७ एप्रिल रोजी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन जाहीर करण्यात आली.
सोलापूर मंडलात अकलूज, बार्शी, पंढरपूर, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर असे पाच विभाग तर २६ उपविभाग आहेत. प्रत्येक उपविभागातून पहिल्या क्रमांचे १, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी दोन विजेत्यांची निवड झाली. ज्यातून पहिल्या क्रमांकासाठी २६ स्मार्टफोन, दुसऱ्या क्रमांकासाठी ५२ स्मार्टफोन आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ५२ स्मार्टवॉच अशी एकूण १३० बक्षिसे ग्राहकांना मिळाली आहेत. प्रत्येक उपविभाग पातळीवर विजेत्या ग्राहकांना सन्मानित करुन बक्षिसांचे वाटप करण्यात आले आहे.
सोलापूर मंडलामध्ये ६८ टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन म्हणून लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील.
0 Comments