महाआघाडीला कपबशी तर देशमुख यांच्या पॅनलला नारळ
मंडूप, (कटुसत्य वृत्त):- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय महाआघाडीच्या उमेदवारांना कपबशी हे चिन्ह तर आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमधील उमेदवारांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असून या उमेदवारांना चिन्हाचे वाटप गुरुवारी निवडणूक कार्यालयात करण्यात आले.
चिन्ह वाटपाची प्रक्रिया संपल्यानंतर दिवसभर या दोन्ही पॅनलच्या नेतेमंडळींनी आपापल्या उमेदवारांची बैठक घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्यास दिसून आले.
शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, बाजार समितीचे माजी उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आमदार कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांनी सर्व उमेदवार आणि कार्यकत्यांनी पॅनलचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचून संपूर्ण पॅनलला विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. बाजार समितीचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत, त्यांच्या संदर्भात चांगल्या योजना राबवण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवित आहोत. तेव्हा संपूर्ण पॅनलला विजयी होण्यासाठी सर्वानी गावोगावी प्रचार करावा, असे आवाहन केले.
आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या संपर्क कार्यालयामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीत आमदार देशमुख म्हणाले, ही निवडणूक आपण कार्यकर्त्यांसाठी आणि बाजार समितीच्या विकासाबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहोत. त्यामुळे कार्यकत्यांनी आणि उमेदवारांनी संपूर्ण पॅनल विजय होण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.
0 Comments