अकलूज येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अहिंसा परमो धर्माची शिकवण देणारे जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर श्री भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव अकलूज परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सकाळी विसाहूमड दिगंबर जैन मंदिर व ट्रस्ट यांच्यावतीने शिवापूर पेठेतील जैन मंदिरातून वाजत गाजत भगवान महावीरांचा रथ व पालखी ग्रामप्रदक्षणा साठी निघाली. यामध्ये श्रावक, श्राविका हजारोंच्या संख्येने जैन समुदाय सहभागी झाला होता. पालखीचे 9 वाजता मंदिरात आगमन झाले.या वेळी समाजाचे अध्यक्ष इंद्रराज दोशी यांनी सर्वांचे स्वागत केले. मंदिरामध्ये भगवान महावीरांच्या मूर्तीस बाहुबली गांधी व सौ. मुग्धा गांधी यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक होऊन दुपारी सन्मती ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. तर सायंकाळी सुमती महिला मंडळाच्या वतीने भगवान महावीराचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होऊन व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.
संग्रामनगर येथील गुमास्ता कॉलनी येथे सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी आठ वाजता भगवान महावीरांची प्रतिमा असलेली पालखी संग्रामनगर परिसरातून वाजत गाजत निघाली. यावेळी श्रावक, श्राविकांनी भगवान महावीरांचा जयघोष केला. येथे भगवान महावीरांच्या मूर्तीला सागर भालेराव व सौ पूजा भालेराव यांच्या हस्ते पंचामृत महाभिषेक करण्यात आला. यानंतर समाजाच्या वतीने उपस्थिततांसाठी महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले. सायंकाळी महिलांनी भगवान महावीरांचा जन्मसोहळा साजरा केला.बागेचीवाडी येथील श्री नवदेवता दिगंबर जैन मंदिरात सकाळी 7 वाजता भगवान महावीरांच्या मूर्तीस पंचामृत अभिषेक मंदिर समितीचे अजित गांधी व सौ. वसुमती गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.
संग्रामनगरच्या भगवान आदिनाथ दिगंबर जिनालय व स्वाध्याय भवन या मंदिरात प.पू. सुव्रता माताजी यांचे प्रवचन झाले. तर सायंकाळी वितराग विज्ञान पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
0 Comments