लोकमंगल कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी स्थापना दिवस संपन्न
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 29 मार्च रोजी राहुरी विद्यापीठाचा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्थापना दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी मौजे कौठाळी या गावामध्ये स्वच्छता अभियान राबवून श्रमदान केले. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे हे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रास्ताविक मांडताना प्रथम वर्षातील विद्यार्थी दत्तप्रसाद चव्हाण याने राहुरी विद्यापीठ स्थापना, विस्तार आणि कार्यक्षेत्र याबाबत सर्वांना जागृत केले. विद्यार्थी मनोगतामध्ये दिग्विजय विधाते याने आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी देशाच्या तथा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा संशोधन क्षेत्रात सिंहाचा वाटा असल्याचे विशेष नमूद केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. अमोल शिंदे यांनी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार या बाबी विस्तृत स्वरूपात समजून सांगितल्या. विद्यापीठातील विविध संशोधन आणि सद्यस्थितीला सुरू असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत त्यांनी विशेष माहिती दिली. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शिक्षणाद्वारे दैदीप्यमान यश संपादन करून विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे नाव कृषी क्षेत्रात उज्वल करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजित कुरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी दत्तप्रसाद चव्हाण याने केले. सदरील कार्यक्रमास सुजाता चौगुले, नम्रता गोरे, मीनाक्षी नाईकनवरे, सुकन्या जाधव, कल्पना मिटकरी आणि विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
0 Comments