Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात महिला, दिव्यांग आणि कृषीसाठी विशेष तरतूद

 सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात महिला, दिव्यांग आणि कृषीसाठी विशेष तरतूद




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेत असलेल्या प्रशासकीय राजवटीतील तिसऱ्या म्हणजेच २०२५-२६ वर्षाचे ४५ कोटी तीन लाख ९० हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर झाले. या अंदाजपत्रकास बुधवारी (ता. १९) विशेष सभेत प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मान्यता दिली.

मागील योजना कायम ठेवतानाच यंदा महिला शेतकरी गटांना ड्रोन फवारणी यंत्र, शेतकऱ्यांना मधुमक्षिकापेटी, आरोग्य केंद्रांत ई ओपीडी, गर्भवतींना दवाखान्यात नेण्यासाठी आशांना खर्च, जनईत्री कार्ड, रुग्णांना युनिव्हर्सल डिस्चार्ज कार्ड देणे, शाळांत सौरऊर्जा संयंत्र बसविणे अशा काही नवीन योजना प्रस्तावित केल्या केल्या आहेत.

गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात ३ कोटींची घट झाली असली तर ७ लाख ७३ हजारांचा शिलकी अंदाजपत्रक सादर केला आहे. निधी उपलब्धतेबाबत व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ॲडमिनिस्ट्रेटर (व्हीपीडीएए) प्रणाली सुरू झाल्यानंतर व्याजाच्या उत्पन्नात घट अपेक्षित आहे.

त्यामुळे यंदा अंदाजपत्रक तयार करताना लेखा व वित्त विभागाने व्याजातून सुमारे १० कोटी कमी व गतवर्षाइतकेच म्हणजे १८ कोटी ५१ लाखांचे उत्पन्न गृहीत धरले आहे. व्याजातून १८ कोटी ५१ लाख, उपकरातून १० कोटी, पाणीपट्टीतून १ कोटी २५ लाख, बांधकामकडील १ कोटी ४२ लाखांचे उत्पन्न गृहीत धरून व आरंभीचे शिल्लक ८ कोटी १४ लाखांचे समावेश करून अंदाजपत्रक बनविले आहे. प्रशासक जंगम यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात नावीन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आला आहे. आरोग्य व कृषी विभागाच्या तरतुदीत गतवर्षाच्या तुलनेत वाढ केली आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले, ग्रामीण विकास यंत्रणेचेच प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या २०२४ - २५ च्या सुधारित व २०२५-२६ च्या मूळ अंदाजपत्रकास बुधवारी (ता. १९) विशेष सभेत मान्यता देण्यात आली. गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागासाठी १ कोटी १२ लाख ७७ हजार, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी पाच लाख, कृषी विभागासाठी १४ लाखांची अधिक तरतूद केली आहे.

मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी सकाळी १०.३० वाजता हे अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सादर केले. त्यांनी ते सभागृहात मांडले. गतवर्षीचे मूळ अंदाजपत्रक ४८ कोटी ११ लाख ६७ हजारांचे तर सुधारित अंदाजपत्रक ५६ कोटी ९४ लाख २५ हजारांचे होते.

महिलांसाठी शक्तीपंख, ड्रोनला ५० लाख

कृषी विभागासाठी गतवर्षाच्या मूळ तरतुदीपेक्षा १४ लाखांची अधिक वाढ केली आहे. एकूण ३ कोटी ८६ लाखांची तरतूद केली आहे. महिला शेतकरी गटांना फवारणी ड्रोन पुरवण्यासाठी ५० लाखांची तरतूद असून जिल्ह्यातील ११ गटांना ४ लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना मधुमक्षिका पेटी मिळणार असून कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टरसाठी ९५ लाख, अभियांत्रिकी योजनेसाठी ९५ लाख, सिंचनासाठी पंप, तुषार सिंचनासाठी ७५ लाखांची तरतूद केली आहे.

दिव्यांगांना ई बाईक, शाळांना सौरऊर्जा संयंत्र

समाजकल्याण विभागासाठी ४ कोटी ६१ लाख २८ हजारांची तरतूद केली आहे. दिव्यांगांना ई रिक्षा व ई बाईकसाठी १ कोटी ३० लाख, अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना मदतीसाठी १० लाखांची तरतूद केली आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दिव्यांग शाळांना सौरऊर्जा संयंत्रासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे.

उत्पन्नवाढीसाठी गाळे बांधणार

जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी गाळे बांधण्यासाठी २७ लाख तर विश्रामगृह दुरुस्ती, विस्तारासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. गाळे बांधकामासाठी जागेची अडचण दूर झाली आहे. तसेच चार - पाच विश्रामगृह सुसज्ज बनविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांसाठी युनिक आयडी, सेवा ॲप

आस्थापना विषयक बाबी सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना युनिक आयडी देण्यात येणार आहे. सोबतच योजनांवर संनियंत्रणासाठी डॅशबोर्ड (ॲप) विकसित केले जाणार आहे. नवीन ६०० कर्मचारी भरती झाली असून १९६ जणांना पदोन्नती दिली आहे. त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments