Hot Posts

6/recent/ticker-posts

देशमुखांची खदखद अखेर बाहेर; 'भाजप सरकारमध्ये सोलापूरला मंत्री बघणं अवघड; भाजपचे मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात'

 देशमुखांची खदखद अखेर बाहेर; 'भाजप सरकारमध्ये सोलापूरला मंत्री

 बघणं अवघड; भाजपचे मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात'

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मागील अडीच-तीन वर्षांच्या काळात आणि त्यानंतर तीन चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या महायुती सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपद मिळालेले नाही. तब्बल पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांनी त्याबाबतची खंत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली. भाजपचे सरकार आल्यावर सोलापूरला मंत्री बघणे अवघड आहे, भाजपचे सर्व मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात,' असा घरचा आहेर देशमुख यांनी भाजपला दिला आहे. विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे  यांचा सोलापूरमध्ये धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात बोलताना आमदार देशमुख यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. या कार्यक्रमास माजी आमदार रामहारी रुपनवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रकाश महानवर, चेतन नरोटे, नरेंद्र काळे आदी उपस्थित होते. माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख  यांनी स्वपक्षीय मंत्र्यांबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर सोलापूरला मंत्री बघणे अवघड आहे. भाजपचे सर्व मंत्री सोलापूरकडे फार दुर्लक्ष करतात. मात्र, सभापती झाल्यावर तुम्ही सोलापूर ला भेट दिलीत, ही मोठी गोष्ट आहे, असे सांगून देशमुख यांनी सोलापूर भाजपमधील खंत बोलून दाखवली. विजयकुमार देशमुख हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, देशमुख यांना डावलण्यात आले. त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांच्या मनात होती. देशमुख म्हणाले, विधान परिषदेचे सभापती झाल्यावर तुम्ही सोलापूरला भेट दिलीत, ही मोठी गोष्ट आहे. राम शिंदे हे दिलदार माणूस आहे. त्यांचा सत्कार होतोय त्याचा मला आनंद आहे. भाजप सरकारच्या 2014 ते 2019 या काळात सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरचं पालकमंत्रिपद भूषवलं होतं. मात्र, 2019 नंतर आजतागायत एकही मंत्री पद मिळालं नाही. विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर होते. मात्र दोन देशमुखांमधील गटबाजीमुळे सोलापूरचे मंत्रीपद हुकल्याची चर्चा आहे. मात्र, मागील अडीच ते तीन वर्षे आणि आताच्या महायुती सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. महाविकास आघाडी सरकारपासून आतापर्यंत सोलापूरला पालकमंत्रीही बाहेरचे मिळाले आहेत. ते पालकमंत्री म्हणून सोलापूरला अत्यंत कमी वेळा येतात, त्यामुळे भाजपचे सरकार आल्यावर सोलापूरला मंत्री बघणे अवघड आहे, अशी आमदार विजयकुमार देशमुख यांनी बोलून दाखवली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments