सौर कृषीपंप योजनेतील त्रुटीमुळे पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी द्या
आमदार कल्याणशेट्टी यांची विधानसभेत मागणी
तालुका /(कटुसत्य वृत्त ):- सौर कृषीपंप योजनेत अनेक त्रुटी असून त्यामुळे शेतकऱ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने योजनेत बदल करून शेतीपंपांना पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पध्दतीने विजेच्या खांबावरून वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधासभेत केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अक्कलकोट मतदारसंघातील शेतीच्या विजेच्या प्रश्नांवरील पुरवणी मागणी अंतर्गत महत्त्वाच्या मागण्या मांडून आमदार कल्याणशेट्टी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तत्कालीन सरकारने 'महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली. मात्र, त्यांना संबंधित साहित्य देण्यात येत नाही. त्यांना कोणत्याही सेवासुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे मनुष्यहानी, पशुहानी आणि पिकाचे नुकसान होते. त्यामुळे दहा ते बारा वर्षांपूर्वी वीज घेतलेल्या शेतकऱ्यांना साहित्य पुरविण्यात यावे, अशी मागणी आहे. प्रधानमंत्री सौर कृषीपंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे, परंतु या योजनेत अपवादात्मक बदल करणे गरजेचे आहेत. बोअरची खोली अधिक असल्याने किंवा अंतर सौर कृषीपंपपासून जास्त अंतरावर असल्याने पंपास ऊर्जा कमी पडते, त्यासाठी या योजनेचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे या योजनेत बदल करून शेतकऱ्यांना पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी.
अक्कलकोट तालुक्यात नवीन उपविभागाची मागणी होत असून यासंबंधी राज्य शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. या उपविभागास लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी. मैंदर्गी आणि दुधनी परिसरातील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो, त्यामुळे शेतीपंप जळण्याचे प्रमाण जास्त आहे. मैंदगी गावात नवीन १३२ के. व्ही. उपकेंद्र प्रस्तावित आहे. राज्य शासनाने या उपकेंद्रास मंजुरी द्यावी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत नवीन पॉलिसीनुसार दिवसा निर्माण होणारी वीज ग्राहक वापरू शकतो. परंतु त्या व्यतिरिक्त निर्माण होणारी वीज मोजली जात नाही. संध्याकाळी वापरल्या जाणाऱ्या विजेवर वीज विल आकारले जाणार आहे. महावितरण विभागात आऊटसोर्सिंग एजन्सीजचे प्रमाण वाढत आहेत. या एजन्सीजकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण केले जाते. सरकारने आऊटसोर्सिंग एजन्सीजवर वचक निर्माण करावा. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांचे शोषण केले जाऊ नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना कल्याणशेट्टी यांनी मांडली.
0 Comments