डमी शाळांत प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही
पुणे (कटूसत्य वृत्त):-जे विद्यार्थी नियमित वर्गामध्ये जाणार नाहीत, त्यांना १२वी बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळणार नाही, असा इशारा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसईने दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, डमी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याच्या दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः विद्यार्थी व त्यांच्या पालकांची असेल. सीबीएसई डमी शाळांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला बसण्यापासून रोखण्यासाठी परीक्षा उपनियमांत बदल करण्यावर विचार करीत आहे. त्यांना एनआयओएसची परीक्षा द्यावी लागेल. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एखादा परीक्षार्थी शाळेतून गायब असल्याचे आढळल्यास किंवा बोर्डाकडून करण्यात आलेल्या अचानक निरीक्षणात अनुपस्थित असल्यास अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. नियमितरीत्या वर्गात जाण्याचे दुष्परिणाम भोगण्यास संबंधित विद्यार्थी व त्याचे पालक जबाबदार असतील.
अलीकडेच बोर्डाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला व हा निर्णय २०२५- २६ च्या शैक्षणिक वर्षात लागू करावा, अशी शिफारस करण्यात आली होती.
0 Comments