पहिल्या दिवशी ११ जणांचे १२ अर्ज दाखल: माजी सभापती शिवदारे, हसापुरे, पाटील आदींचा समावेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ११ जणांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. माजी सभापती राजशेखर शिवदारे, माजी उपसभापती सुरेश हसापुरे, माजी संचालक वसंत पाटील प्रमुख मान्यवरांचा यात समावेश आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीच्या स्थगित झालेल्या प्रक्रियेला सोमवारी सुरवात झाली. शुभ दिवस असल्याने माजी सभापती शिवदारे, माजी उपसभापती हसापुरे, माजी संचालक पाटील यांच्यासह एकूण ११ जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडे अर्ज दाखल केले.
हसापुरे यांचे दोन गटातून अर्ज
माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांनी सहकारी संस्था सर्वसाधारण व इतर मागासवर्ग अशा दोन गटांतून अर्ज दाखल केला आहे. ते बाहेर असल्याने अनुक्रमे सूचक काशिनाथ गोटे, महादेव फुलारी यांनी त्यांचे अर्ज दाखल केले. भंडारकवठ्याचे माजी संचालक वसंत पाटील यांनी सहकारी संस्था सर्वसाधारण तर त्यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील यांनी सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून अर्ज भरला आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व आर्थिक दुर्बल, अशा तिन्ही गटांतून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
२५० जणांनी नेले अर्ज
सोमवारी २५० जणांनी उमेदवारी अर्ज नेले. मागील प्रक्रियेवेळी ऑक्टोबरमध्ये १८१ जणांनी उमेदवारी अर्ज नेले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार (ता. २८) पर्यंत मुदत आहे.
मतदारसंघनिहाय दाखल उमेदवारी अर्ज
सहकारी संस्था सर्वसाधारण ः सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, शिवानंद बगले पाटील (कुडल), राजशेखर सगरे (बंकलगी), वसंत पाटील (भंडारकवठे), सुरेश कराळे (देगाव), श्रीशैल पाटील (तेलगाव). सहकारी संस्था महिला राखीव ः माहेश्वरी बिराजदार (निंबर्गी). सहकारी संस्था इतर मागासवर्ग ः सुरेश हसापुरे. सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती ः प्रथमेश पाटील (भंडारकवठे). व्यापारी प्रतिनिधी ः अरुणा होसमठ (शेळगी). हमाल तोलार प्रतिनिधी ः गफ्फार चांदा (सोलापूर).
0 Comments