शिवद्रोही प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
कोल्हापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने आता कोरटकरकडून तातडीने जामिनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्च रोजी प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेतल्यानंतर २५ मार्च रोजी त्याला पहिल्यांदा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २८ मार्च रोजी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्य करून राज्यभरातील शिवप्रेमींच्या संतापाचा सामना करत असलेला प्रशांत कोरटकर हा जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती असून त्याच्या जामिनाबाबत न्यायालयाकडून काय निर्णय देण्यात येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोरटकरची मदत कोणी केली?
प्रशांत कोरटकर हा पसार असण्याच्या काळात त्याने वापरलेल्या कार पोलिसांनी नागपुरातून जप्त केल्या, तसेच १७ ते २४ मार्चच्या दरम्यान त्याला खर्चासाठी दीड लाखाची रोकड कोणी दिली, याचीही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
कोरटकर याने पसार काळात नागपूर, चंद्रपूर, बैतूल, हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर आणि करीमनगर (तेलंगणा) येथे वास्तव्य केले. यासह तो वावरलेल्या एकूण १८ ठिकाणांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नागपुरात गेलेल्या पथकाने कोरटकर याची एक आलिशान कार जप्त केली, तसेच त्याचा मित्र मटका बुकी धीरज चौधरी याचीही कार जप्त केली.
0 Comments