Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढविण्याची आ. सुभाष देशमुखांची घोषणा; विजयकुमार देशमुखांची माघार

 सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढविण्याची आ. सुभाष देशमुखांची घोषणा; विजयकुमार देशमुखांची माघार





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकतीच मंंजुरी दिली असून येत्या मंगळवारपासून (ता. २५) अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २७ एप्रिल रोजी मतदान, तर २८ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील नेतेमंडळी निवडणुकीच्या कामाला लागली आहेत. दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनेल उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सुभाष देशमुख सहकार मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजार समितीत मतदानाचा अधिकार दिला होता. त्यानंतर ती सवलत रद्द करण्यात आली होती. मागील निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या पॅनेलच्या विरोधात माजी आमदार दिलीप माने, आमदार विजयकुमार देशमुख आणि बळीराम साठे यांचा पॅनेल होता. त्यात सर्वपक्षीय असलेल्या माने-देशमुख-साठे पॅनेल विजयी झाला होता.

सुभाष देशमुख यांनी आता पुन्हा बाजार समितीसाठी कंबर कसली आहे. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी समर्थकांची बैठक घेतली. त्या बैठकीत स्वतंत्र पॅनेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, विजयकुमार देशमुखांनी निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. पण त्यांचा पाठिंबा कोणाला असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण १८ संचालक निवडले जाणार आहेत. त्यात विविध विकास कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांमधून ११, तर ग्रामपंचायतींच्या सदस्यांमधून चार, व्यापारी मतदारासंघातून दोन आणि हमाल-तोलार मतदारसंघातून एक, अशा पद्धतीने १८ संचालक निवडले जाणार आहेत.

राजकीय समीकरणे काय असणार?

दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्याकडे सर्वाधिक विकास सोसायट्या आहेत. राष्ट्रवादीचे बळिराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांच्याही ताब्यात ग्रामपंचायती आणि सोसायट्या आहेत. काही ग्रामपंचायती आणि सोसायट्यांवर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख यांचेही वर्चस्व आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश वानकर, शिंदेसेनेत प्रवेश केलेले अमर पाटील यांचीही ताकद आहे, त्यामुळे कोण कोणाला मदत करणार, याची उत्सुकता असणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments