अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा- नीतेश कराळे
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सध्या जनतेला चहूबाजूने घेरले जात आहे. जनतेची शुद्ध फसवणूक सुरू आहे या होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात जनतेने आवाज उठवला पाहिजे.महत्त्वाचे प्रश्न दडपण्यासाठी विविध विषय उकरून सरकार लोकांची दिशाभूल करताना दिसत आहे यावर लोकांनी आता जागृत राहून आवाज उठवला पाहिजे असे मत फिनिक्स अकॅडमीचे संचालक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे मास्तर यांनी व्यक्त केले.
अकलूज येथे प्रतिवर्षीप्रमाणे मूकनायक प्रतिष्ठानच्यावतीने मूकनायक परिसंवाद या कार्यक्रमाचे रविवार दिनांक १६ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नलावडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कराळे मास्तर हे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिमा पूजन करून पूज्य भंतेजी गोविंदो मानदो यांचेकडून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश लोंढे यांनी केले.
तदनंतर उपस्थित मान्यवरांचा मूकनायक प्रतिष्ठानच्यावतीने यशोचित सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या मान्यवरांना याप्रसंगी मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार एल डी वाघमोडे , साहित्य क्षेत्रातील पुरस्कार बा ना धांडोरे, विधिज्ञ क्षेत्रातील पुरस्कार ॲड सुमित सावंत तर शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार सुनंदा काटे वाघमारे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांनाही विशेष सन्मान करून गौरवण्यात आले.
यावेळी अध्यक्ष भाषणात डॉक्टर पांडुरंग नलावडे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुढे बोलताना कराळे मास्तर म्हणाले की, सध्या देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतंत्र कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू असून देशामध्ये आराजकता माजेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे त्यामुळे लोकांनी सजग नागरीकाप्रमाणे वागून या देशासाठी जागरूक राहणे गरजेचे वाटू लागले आहे.न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला पाहिजे अशी कृत्ये सरकार करताना दिसत आहे. मूकनायक प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजासमोर आदर्श घालून दिला आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
मूकनायक प्रतिष्ठान अकलूजच्या वतीने मागील तीन वर्षापासून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाला उजाळा मिळावा यासाठी समता सैनिक दल प्रमुख, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक प्रतिष्ठानची स्थापना केली. वैचारिक आणि सामाजिक प्रबोधन पर अशा कार्यक्रमाचे आयोजन करून या प्रतिष्ठानने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन... यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूकनायक प्रतिष्ठानचे पत्रकार बांधव डी एस गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सागर खरात,सुजित सातपुते, कैलास कांबळे यांनी परिश्रम घेतले. तर शेवटी आभार आनंदकुमार लोंढे यांनी मानले.
कोट
- पुस्तके खरेदीसाठी झुंबड...
सदरच्या परिसंवाद कार्यक्रमात वैचारिक पुस्तकांची विक्री करण्यासाठी बुक स्टॉल उभा करण्यात आले होते याचा लाभ सर्वांनी घेतला. सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध झाल्याने असंख्य वाचकांनी या ठिकाणी विविध पुस्तकांची खरेदी केली जवळपास या कार्यक्रमातून सव्वा लाख रुपयांची पुस्तके वाचकांनी नेली. पुस्तके खरेदी करण्यासाठी अक्षरशा झुंबड उडालेली दिसली.
0 Comments