वीस हजारांची लाच घेताना उप अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
करमाळा (कटूसत्य वृत्त):- बेकायदेशीरपणे कामे करुन घेण्यासाठी लाच देणे हा आता नवीन कायदा झाल्यासारखे काही अधिकारी वागत असतात. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे लोकांची कामे अडवून पैसा उकळणे हे काही अधिकाऱ्याना रोजचेच झाले आहे. व अशा अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लगाम घालण्याचे काम सुरु आहे. तरी सुद्धा काही अधिकारी राजरोसपणे लाच घेतच असतात. अशाच प्रकारची करमाळ्यातील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या प्रभारी उप अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून कारवाई केली आहे. याबाबतीत सविस्तर माहिती अशी कि, गुरुवार दि. 27 मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुणे परिक्षेत्रातील सोलापूर युनिटने, करमाळा बांधकाम विभागात शाखा अभियंता तसेच प्रभारी उप अभियंता असलेले बबन हिरालाल गायकवाड यांनी रस्ते सुधारणा कामाचे बिल काढण्यासाठी, संबंधित काॅन्ट्रॅक्टरच्या सुपरवायझरकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये तडजोडी अंती 20 हजाराची लाच देण्याचे मंजूर झाले. यानंतर गायकवाड यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या सर्व बाबतीत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments