नगरपालिका निवडणुकीची बार्शीतील इच्छुकांना प्रतीक्षा
बार्शी (कटूसत्य वृत्त):- नगरपालिका निवडणुकीची मुदत तीन वर्षे लोटल्यानंतरही सातत्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याची परिपत्रके शासनस्तरावरून निघत आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी बार्शीत इच्छुकांची संख्या गतवेळीप्रमाणेच अधिक आहे. या इच्छुकांना आता नगरपालिका निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याचीच प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, अद्याप तरी नगरपालिका निवडणुकीच्या तारखेबाबत कोणताही अंदाज समोर आलेला नाही. मुदत संपल्यानंतर तीन वर्षांपासून पालिकेचा कारभार प्रशासकावर सुरु आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी नगरपालिका निवडणूक होईल, असा अंदाज बांधला जात होता. त्याबाबतच्या हालचालही सुरु होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुकीचा मुद्दा मागे पडला. नगरपालिकेची मुदत संपून आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, अद्यापही यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. बार्शी नगरपालिका व बार्शी बाजार समितीची मुदत संपून बराच काळ लोटला असल्याने या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता बार्शीकरांसह राजकीय नेत्यांनाही आहे.

0 Comments