Hot Posts

6/recent/ticker-posts

मैत्रीचे डेरेदार झाड : विलासराव घुमरे (सर)

 मैत्रीचे डेरेदार झाड : विलासराव घुमरे (सर)




माणसाचे आयुष्य ही अशी एक अतर्क्स गोष्ट आहे की आपण कोणतेही अंदाज, कुणाविषयीही बांधू शकत नाही आणि समजा काही अडाखे बांधले तर ते बरोबर येतीलच याची काहीही खात्री देता येत नाही. श्री. विलासराव घुमरे यांचे आयुष्यही असेच आहे. ज्याच्या बद्दल आपण कितीही लिहित, बोलत, सांगत राहिलो तरी काहीतरी शिल्लक राहिलेलेच असते. इतके सांगूनही रोज एखादा नवा पैलू आपल्याला सापडतो आणि आपण स्वतःला बजावतो, ‘अरे, हे सांगायचे राहिलेच.

मित्रवर्य घुमरेसरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आठवणी डोळ्यासमोर आहेत. शून्यातून सुरुवात झालेला विलास आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याचे सारे काम आपल्या समोर उघड्या पुस्तकासारखे आहे. कुणीही यावे अन् कुठलेही पान वाचावे त्याला काहीना काही प्रेरणादायी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक परिस्थिती सामान्य असली तरी थोडक्यात खिसे रिकामे असलेतरी मन आनंदाने काठोकाठ भरलेले असे. जगणे इतके निरागस होते की सगळी माणसं चांगली आहेत, सहकार्यशील वृत्तीची आहेत. आपल्या उत्कर्षासाठी आसुसलेली आहेत असा काळ होता जेव्हा आमची शालेय मैत्री सुरु झाली. ना इंग्रजी माध्यमच्या शाळा नव्हत्या, पायात पॉलीश केलेले बूट नव्हते, गळ्यात अडकवलेला टाय नव्हता की न पेलवणारे दप्तराचे ओझे नव्हते. सारे कसे मोकळे, सोपे आणि स्वागतशील होते. शाळेत जायला ‘स्कूल बस' नावाची परी नव्हती आणि आणायला पालकांना वेळ नव्हता. घरातील एक अतराब पिशवी हेच दप्तर एक पट्टी, पांढरीशुभ्र पेन्सिल, एखादे पुस्तक, वही एवढे असले की श्रीमंती काय असते ते कळायचे. आम्ही ना पालकांकडे हट्ट धरला, ना त्यांनीही आवडीकडे फार गांभीर्याने पाहिले. गुरुजी हेच दैवत, छडी जोडीदार. पायात
चप्पल ही तर श्रीमंतीची खूण असे आमचे सर्वांचेच. शिक्षण एक नंबर शाळेत सुरु झाले. पुढे महात्मा गांधी विद्यालय नावाच्या मंतरलेल्या जगाने आमची ओळख आम्हाला करुन दिली. स्व. ना. बा. परदेशी सर आमचे तिथले भाग्य घडवणारे गुरुवर्य होते. सारेच शिक्षक आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, काळजी, धाक यांनी भरलेले होते. ग्राऊंडवर पालकर सर, पाटील सर सतत उभे असत. विलास वर्गा पेक्षाही ग्राऊंडवरच जास्त घडला. मल्लखांब पासून ते क्रिकेटपर्यंत तो शाळेचा मानबिंदू ठरला. त्यालाही एक आत्मविश्वास आला आपल्याला काय येते हे त्याला कळते तोच पुढे श्री. विलासराव घुमरे होतो. शरीरयष्टी मजबूत पण मन खूप कोमल इथेच मैत्रिचा विस्तार झाला. पुढे ज्या यशवंतराव चव्हाण महविद्यालयाचा आज तो सर्वेसर्वा आहे त्याच कॉलेजात तो शिकू लागला. पण जगण्याला आर्थिक कमतरतेची झळ बसत होती. वडील एस. टी. मध्ये कामाला, घरातले भावंडे त्यांचे सारे करता करता आई थकून जायची. घराचे नेतृत्व  आपल्याला केले पाहिजे हे कुणालाही न सांगता त्याने स्वीकारले ते आजतागायत निभावले आहे. जगायला तर हवेच पण त्यात आत्मसन्मान असला पाहिजे हा त्याचा पहिल्यापासूनचा कटाक्ष आहे. आज सत्तरीच्या उंबरठ्यावरही कपड्यांच्या घड्या नीट असाव्यात पण मनाला एकही गुडी पडता कामा नये हे त्याने सांभाळले आहे. एक मित्र म्हणून ही फार अभिमानाची गोष्ट आहे. कॉलेजात असल्यापासून तो नोकरी करु लागला. वडिलांच्या प्रपंचात मदत करु लागला. हवे नको ते पाहू लागला. जबाबदारी आपणहून घेतली होती त्याची कुरकुर त्याने आजपावेतो कधी केली नाही. आम्ही कधी कधी मित्र म्हणून निराश होतो थांबल्यासारखे करतो तेव्हा विलासचा हात पाठीवर असतो 'चल' असे एकच वाक्य तो उच्चारतो आणि सारे सुरळीत होऊन जाते. मैत्री खाण्यापिण्यापुरती नसतेच कधी त्याची म्हणूनच त्याच्या मैत्रीचा गोतावळा चाढतो आहे. ही त्याच्या आयुष्यातील फार मोठी कमाई आहे. प्रश्न त्यालाही आहेत, समस्या आहेत पण म्हणून त्याचे भांडवल त्याने कधी केले नाही आज सतत वाटत रहाते आपल्याला असा एखादा तरी मित्र असावा विलाससारखा. अरे आपल्याबरोबर ती सुध्दा फार आश्वासक गोष्ट आहे. मैत्री अशीच चिरंतन राहो. मित्रवर्य विलास घुमरेसरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ...प्रा. डॉ. राजेंद्र दास सर, कुर्डुवाडी

Reactions

Post a Comment

0 Comments