Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्रातील पिंपळपान : मा. श्री. विलासराव घुमरे सर

 शिक्षण क्षेत्रातील पिंपळपान : मा. श्री. विलासराव घुमरे सर




प्रेम... प्रज्ञा अन प्रेरणेच्या सभा मंडपात म्हणजेच सरस्वतीच्या प्रागंणात असलेल्या प्राजक्तांच्या फुलांचं खरं दैवत म्हणजे ते विद्यामंदिर आणि त्या विद्या विकास मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत असणारे आदरणीय श्री. विलासराव घुमरे सर. खरंतर वाढदिवस म्हणजे आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये प्रथम रडलो आणि ते बघून आपली आई मनापासून हसली... सरकारी दवाखान्याच्या व्हरंड्यात येरझरा मारणाऱ्या आपल्या बापाचं मुठी एवढं असणारं काळीज आनंदान कवा सुपा एवढं झालं काय सांगू म्हणजे आपला वाढदिवस. तर या ज्ञान पंढरीच्या मंदिरातील आदरणीय घुमरे सर यांचा वाढदिवस ६ फेब्रुवारी म्हणजे सोन्यापेक्षाही मौल्यवान आणि त्याचं औचित्य साधून प्रथम सरांचं अभिष्टचिंतन. माझं शिक्षण हे करमाळा तालुक्यातील पोमलवाडी येथे १९७५ च्या दरम्यान झालं. खरं तर सध्या मी राहतो त्या पुण्याच्या मांजरी परिसरातील फ्लॅटच्या गॅलरीत आराम खुर्चीवर बसलो असताना जवळच जिल्हा परिषदेची शाळा रोडच्या अगदी अलीकडे आहे. वेळ घालवायचा म्हणून शेजारी लव बर्डच्या पिंजऱ्यात दोन - चार दोस्त शेजारी नाजूक फिंच असे पक्षी मधुर चिवचिवाट संध्याकाळचा वेळ कसा जातो हे कळतच नाही. समोरची रहदारी मन प्रसन्न ठेवते तशातच सहा वाजता प्रत्येक पालकाची आपल्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जाण्याची ती लगबग कोणी हाताला धरुन... कोणी सायकलवर... तर कोणी दुचाकीवर... ते दृश्य खूप विलोभणीय अन मग आमचे आदरणीय घुमरे सर अलगद डोळ्यासमोर उभे राहतात. काय योगायोग बघा असंच काहीसं आपलं बालपण.. पहिल्यांदा आठवते ती आपली विद्यार्थी दशा, गुरुजी ते सर अशा या विचाराच्या चक्रव्यूहातून बाहेर यायचा एकच मार्ग तो म्हणजे शांत विचारांन विशेष शैलीतून कागदावर उतरवलेले आदरणीय सचिव घुमरे सरांबद्दलचे चार शब्द. थोडी विचारांची ड्रिल मशीन जोरात चालवली इतिहासाची पानं चाळली सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिकवणं वेगळं आणि घडवण अन त्यांना योग्य सुख सुविधा मिळवून देणं तर त्यातूनच वेगळं खरचं सर हे काम कौतुकास्पद रित्या करत असतात. सरांचा व्यासंग दांडगा सामाजिक... राजकीय व कौटुंबिक क्षेत्रातील महत्वाची भूमिका पार पाडावी लागते ही एक तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. सरांचा राजकीय क्षेत्रातील प्रभाव पाहता लाभलेली लोकप्रियता अवर्णनीय आहे एका दृष्टीने सरांचा प्रत्येक अनुभव हा वाखाणण्याजोगा त्यांनी दिलेली शिकवण चार शब्दात मांडायची म्हटलं तर माननीय घुमरे सर नावाचा अखंड प्रवाह वाहतो आहे थोडक्यात म्हणजे या प्रवाहात त्यांना गोड... कडू... आबंट... खारट ... तुरट तर काही चाट मसाल्यावानी पण माणसं लाभली. काहींनी या प्रवाहाचा पुरेपुर फायदा घेतला... काहींनी प्रवाह अर्धवट सोडला... सांगायचं झालं तर मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी ओठ हे एक माध्यम असतं... का ? एक तर त्या भावनांना ओठातून बाहेर पडावं लागतं.. व्यक्त व्हावं लागतं.. किंवा त्या भावना प्रतिकूल परिस्थितेमुळे बंधनामुळे मातीत काढाव्या लागतात अन्यथा अजून एक पर्याय उरतो तो म्हणजे पेन अन कागद.. त्या भावनांना मनोगताच्या सुपात घोळवून.. अंगणात विसकटून टाकाव्यात अन त्या प्रत्येक शब्दाला चंदनाचा लेप लावून पांढऱ्या शुभ्र कागदाच्या स्वाधीन करावं लागतं त्यातून जन्मांना येतात सरांचे विचार अन चार शब्दाचे लेखन. कायम सदाबहार व्यक्तिमत्व असणारे माननीय घुमरे सर आज या वयातही विद्या विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची धुरा सचिवपणाच्या माध्यमातून यशस्वीपणे सांभाळत आहेत. याशिवाय प्रगतशिल शेतकरी... यशस्वी उद्योजक म्हणून.. राजनिती कुशल मार्गदर्शक... या भूमिका आपल्या बुध्दीच्या.. सामर्थ्याच्या.. अनुभवाच्या...जोरावर एका वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने पार पाडताना दिसून येतात. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे आधारवड ... संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे सर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करीत राहणे हा त्यांचा मूळ स्थायी स्वभाव सरांचे वडील एस.टी.महामंडळात नोकरीला सरांनी ग्रॅज्युएट पूर्ण केल्यावर आदरणीय स्व. नामदेवराव जगताप यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनातून करमाळा विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव म्हणून नोकरीला सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीवर सुध्दा त्यांनी यशस्वी वाटचाल केली. नंतर राजकीय व सामाजिक कार्यात सहभागी होऊन अनेकांना आपल्या मार्गदर्शनाने यशस्वी केले. त्यांच्या प्रगल्भ बुध्दीमत्तेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सर म्हणजे किंगमेकर... मास्टर माईंड... पडद्यामागचे खरे सूत्रधार... या रंगमंचावरील एक दिगदर्शक... ही त्यांची खरी ओळख मोजके बोलणे म्हणजे बाते कम काम ज्यादा हे त्यांचे विशेष. करमाळा तालुक्याचे राजकारण म्हणजे विशेष खास बात यामध्ये राजकीय वाटचालीमध्ये सरांनी आपल्याकडे असलेल्या बुध्दीबळाच्या सोंगट्यांचा वापर अतिशय तल्लकपणे केलेला पहावयाला मिळतो. करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय स्व.दिगंबरराव बागल मामा यांचा सरपंच ते करमाळा तालुका पंचायत समितीचे सभापतीपर्यंत त्यानंतर त्यांना अपक्ष म्हणून विधानसभेमध्ये निवडून आणून आमदार ते थेट मंत्री पदापर्यंतच्या प्रवासात महत्वपूर्ण वाटा व एक किंगमेकर ठरले. आदरणीय स्व. दिगंबरराव बागल मामांच्या निधनानंतर माननीय शामलताईना आमदार म्हणून निवडून आणण्यामध्ये मोलाचा वाटा. त्यानंतर माननीय रश्मी दीदी व माननीय दिग्विजय भैय्या (प्रिन्स) यांना मकाई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मुख्य राजकीय प्रवाहात आणण्याचं मोलाचं काम केल. त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये महत्वाच मार्गदर्शन केलं आजही सर त्याच उमेदीने विद्या विकास मंडळाचे सचिव म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहेत. 
कॉलेजच्या मार्गावर दत्त मंदिरापासून उभी असलेली झाडे.. भव्य क्रिडांगण.. भव्य शूटिंग रेंज हॉल.. सुसंपन्न ग्रंथालय.. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा हे सारे उपलब्ध असण्यामागे त्यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा आहे. तालुक्यातील सर्व जाती- धर्मातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे या माध्यमातून महाविद्यालयाची प्रगती होत आहे. मित्र जोडणे.. मित्र टिकवणे.. हा सरांच्या व्यक्तिमत्वाचा दिमाखदार पैलू. सरांचं खरं कार्य म्हणजे सरस्वतीच्या प्रांगणातल्या फुलांना सचिव पदाच्या माध्यमातून ज्ञानामृत पाजनं तर अशा या महान उपासकाला सलाम.. कारण सरांचं या शिक्षण क्षेत्रातलं योगदान त्यानं उंचीचा कळस गाठलाय पण या अशा विभूतीचं कौतुक करणारे आपण कोण पण त्यातून पण दोन शब्द आणि व्यक्त व्हावं.. एका विशिष्ट क्षेत्रामध्ये ही महती जावी.. अजून एक वेगळा चाहत्यांचा परिवार निर्माण व्हावा.. कारण प्राथमिक शिक्षण हे घडवण्याचं काम करतं पण दहावीच्या पुढचं शिक्षण

काय करावं याबद्दल अक्षरशः वेगळ्या वळणावर येऊन थांबल्यासारखं वाटतय अन अशावेळी सरांसारखा दीपस्तंभ असल्यावर पुढे प्रगतीपथावर जाणाऱ्यांची रांग लागलेली असते. जीवनामध्ये सगळे विविध कडू.. गोड अनुभव घेऊन समृध्द झालेले सर कसोटीच्या प्रसंगातून तावून सुलाखून निघालेले पाहिलेत स्वतःचे दुःख लपवून हसतमुखाने जीवनाला सामोरे जाणारे सर सार्वजनिक जीवनामध्ये जसे यशस्वी व समाधानी आहेत अगदी तसेच कौटुंबिक जीवनामध्येही समाधानी आहेत. सरांचा जन्म ६ फेब्रुवारी १९५५ खरं तर सरांनी सत्तरी गाठलीयं पण तरुणाला लाजवेल असा उत्साह सरांमध्ये पाहायला मिळतो. सरांचं वय ७० आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. पण सरांचं मानसिक किंवा वैचारिक वय हे जवळजवळ वीस पंचवीस वर्षानं मोठं आहे म्हणजे बघा आपण जेव्हा मराठी शाळा काढायची म्हणतो तेव्हा सरांनी हायस्कूल सुरु केलेलं असतं अन आपण हायस्कूल काढावं असा विचार मनात आणला तेव्हा सरांच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश सुरु झालेला असतो असे व्यक्तिमत्व वास्तविक वयापेक्षा वीस पंचवीस वर्षानं वैचारिक दृष्ट्या पुढे असतात आणि हे असं भाग्य खूप  कमी लोकांना लाभत.

आमच्या आदरणीय सौ. जयश्री वहिनी सरांच्या आयुष्यामध्ये गृहलक्ष्मी म्हणून आल्या आणि भाग्यलक्ष्मी कधी झाल्या ते कळलंच नाही. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या अर्धांगिनीचा मोलाचा वाटा असतो. आदरणीय सरांच्या आणि सौ. जया वहिनींच्या संसार वेलीला लागलेली दोन गोंडस फुले म्हणजे विक्रांत आणि आशुतोष अवघे जन सुशिक्षित करणारा हा विध स्वतःच घर अडाणी कसं बरं ठेवेल सरांचे दोन सुपुत्र अॅडव्होकेट माननीय विक्रांत हे एक आदर्श कायदे सल्लागार तर दुसरे माननीय आशुतोष हे यशस्वी उद्योजक आहेत. दोन मुलं.. सुना.. नातवंड यांच्या गोड सहवासात म्हणजेच या गोकुळामध्ये आमचे सर आणि वहिनी सुखी संपन्न आणि समृध्द जीवनाचा अविट आनंद घेत आहेत अन त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो ही सदिच्छा. आदिशक्ती श्री कमलादेवी मातेच्या चरण स्पर्शाने पावन अशा करमाळा या पुण्यनगरीत सरांचं कार्यक्षेत्र केव्हढं भाग्य.. पुन्हा एकदा सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनापासून अभिष्टचिंतन !!!
... श्री. किरण बेंद्रे, मांजरी (पुणे)
Reactions

Post a Comment

0 Comments