सोलापुरातून ७६९१ जणांनी दिली परीक्षा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला एक हजार ९४९ जणांची दांडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पदासाठी आज पूर्व परीक्षा झाली. सोलापूर शहरातील २७ केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत एकाच सत्रात परीक्षा झाली. या परीक्षेत ७ हजार ६९१ जणांनी सहभाग घेतला होता. सोलापुरात ही परीक्षा सुरळीत पार पडली आहे.
या परीक्षेसाठी एकूण ९ हजार ६४० उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी आजच्या परीक्षेसाठी ७ हजार ६९१ उमेदवार उपस्थित होते. आजच्या परीक्षेसाठी १ हजार ९४९ जण अनुपस्थित राहिले. सोलापूर जिल्ह्यात ही परीक्षा सुरळीत पार पाडावी. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने चोख नियोजन करण्यात आले होते.
या परीक्षेसाठी २७ उपकेंद्रप्रमुख, १३४ पर्यवेक्षक, ४५७ समवेक्षक, ५४ लिपिक, २३६ चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती. या शिवाय पोलिस आयुक्तालयाकडून १३५ पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. आजच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिस व परिक्षा यंत्रणेच्यावतीने विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली होती.
0 Comments