उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील यांची मागणी
अनगर (कटूसत्य वृत्त):-
आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीनसाठी चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये शंभर कोटी रुपयांच्या भरीव निधीची मागणी महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजन पाटील -अनगरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत त्यानुसार आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाहीची तरतूद करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनास दिल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून बोलताना दिली.
याबाबत बोलताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले की मोहोळ तालुक्याच्या उर्वरित हरितक्रांतीचा टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आष्टी उपसा जलसिंचन योजनेसाठी यापूर्वी शासन स्तरावरून आम्ही शेकडो कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या टप्पा क्रमांक तीनसह सर्व कामांसाठी आणखी ७३५ कोटी रुपयांच्या नीधीची आवश्यकता आहे.
तसेच या पुर्वीच आष्टी उपसा सिंचन योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित कालवा आणि अन्य कामे आणि नव्याने समावेशित झालेल्या अनगरसह दहा गावच्या सिंचन योजनेच्या सुधारित आराखड्यासाठी ३९५ कोटी ४८ लाख रुपयांच्या नीधीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी आवर्जून नमूद केले. येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्यास त्याचा फायदा नव्याने निर्माण करण्यात येणारे पंप हाऊस आणि मेन लाईनच्या उभारणीला होणार आहे.
चौकट
गत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मोहोळ येथील दौऱ्यावर अजितदादा पवार आले असता आपल्या प्रास्ताविक भाषणातून युवा नेते बाळराजे पाटील यांनी या महत्वपूर्ण सिंचन योजनेसाठी भरीव निधी देण्याची मागणी व्यासपीठावरच सर्वासमक्ष केली होती. त्यावेळी ना.अजितदादांनी या योजनेला आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन सर्वां समक्ष दिले. आता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे माजी आमदार पाटील यांनी येत्या अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांच्या निधीची मागणी लेखी पत्राद्वारे करत पाठपुरावा सुरू केल्याने मतदारसंघाच्या दृष्टीने शक्तिमान असणारी ही योजना पूर्ण होण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.
0 Comments