जो पर्यंत Evm मशीनवर मतदान होत राहील तो पर्यंत पारदर्शक
निवडणुका शक्य नाही, सर्व निवडणुका
बॅलेट वर होईपर्यंत हा लढा चालू राहील :- प्रणिती शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, लोकशाहीचे रक्षणासाठी, मतदारांच्या हक्कांसाठी, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्यात यावे या मागणी साठी काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यात नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय आश्चर्यकारक अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणूक सत्ताधारी भाजप युतीचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. आम्ही जेव्हा जनतेत जात होतो तेव्हा जनता सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात दिसत होती. आय बी रिपोर्ट, सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते. अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. मतदार यादीमध्ये घोटाळा करण्यात आला त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याचे अंतरात तब्बल ५० लाख मतांची वाढ कशी झाली मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यात मोठे तफावत आहेत ७६ लाख मतदान वाढवलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था होती त्यामुळे मतदार याद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे आज पर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. अक्कलकोट च्या अपक्ष उमेदवाराला स्वतःचे सुद्धा मतदान झाले नाही असे EVM मध्ये दिसले आहे असे प्रकार अनेक ठिकाणी दिसून आले. निवडणूक आयोग ही भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहे. राज्यातील मतदारांचा विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे. आज दिनांक २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असून या दिवसाच्या असून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाचा पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे. लोकशाही खंबीर ठेवण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे व लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आधार सन्मान विश्वास कायम ठेवून विश्वासहर्ता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे. अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळविले प्रजासत्ताक देश निर्माण केला पण आज प्रजासत्ताक देश आहे का असे वाटत आहे. लोकशाही आणि संविधानाचे खून करणारी विचारसरणी देशावर राज्य करत आहे. त्यांच्याविरुद्ध आणि EVM मशीन बंद होईपर्यंत हा लढा चालूच राहील.
या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, . नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, शकील मौलवी, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, तिरूपती परकीपंडला, नागनाथ कदम, सातलिंग शटगार, अशोक कलशेट्टी, सुमन जाधव, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, शोभा बोबे, रेखा बिणेकर, नागनाथ शावणे, वीणा देवकते, विवेक कन्ना, संघमित्रा चौधरी, नूर अहमद नालवर, रजाक कादरी, ज्योती गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments