दोन संस्कारपीठे!
आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा ( जि. बुलढाणा ) येथे झाला. विखुरलेल्या देश बांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊंचे जीवन चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील लखोजीराव जाधव यांनी त्यांना मुलांबरोबरच राजनीति आणि युद्धकलेचे शिक्षण दिले होते. ४०० वर्षांपूर्वी आपल्या मुलीला मुलाप्रमाणे वाढवणारे लखोजीराव आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजेत . रांधा,वाडा,उष्टी काढा...याच्यापुढे मुलींना आज घेऊन गेलो तरच शिवबा, संभाजीराजे,ताराराणी... पुन्हा समाजामध्ये निर्माण होतील.
शहाजीराजांबरोबर झालेल्या विवाहानंतर या दोघांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला. आदिलशाही निजामशहा आणि मोगल यांच्याविरुद्ध शहाजीराजांनी वेळोवेळी बंड केला. अशा संकटाच्या काळात आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून त्या पुढे राहिल्या. आपले पुत्र शिवबा यांना लहानाचे मोठे करताना जिजाऊंनी त्यांना सुसंस्कार दिले. जिजाऊ बाल शिवबाला रामाच्या, भिमाच्या, कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या गोष्टी सांगात.त्या शिवरायांना म्हणत,' शिवबा, भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र! श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचे पूर्वज श्रीकृष्ण त्याने दृष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले.श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. ' या प्रकारचा संस्काराने शिवरायांना हुरूप यायचा. आपण न्याय व्हावे,धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागायचे. पुढे शिवरायांनी आपल्या मातेच्या प्रेरणेनेच हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पन्हाळगडाला सिद्धीने वेडा दिला आणि शिवराय गडात कोंडेले गेले.त्यावेळी राजमाता पन्हाळ्याच्या दिशेने हातात तलवार घेऊन लढण्यासाठी निघाल्या. नेताजी पालकरांनी,'आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी घेऊ नये.' असा निरोप पाठवला. अशा प्रकारे जिजाऊ वेळप्रसंगी हातात तलवार घेऊन लढणाऱ्या होत्या. राजमाता जिजाऊंनी संभाजीराजांना त्यांच्या आईच्या मृत्युपच्यात सुसंस्कार दिले. त्यांचा सांभाळ केला. या अर्थाने राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचे त्या काळातील 'संस्कारपीठच' होते. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत. त्या काळात समाजात सती प्रथेचा बोलबाला होता. अशा काळात राजमाता जिजाऊंनी सती प्रथेला विरोध केला. आज महाराष्ट्र पुरोगामी आहे असं आपण म्हणतो,पण हा महाराष्ट्र पुरोगामी होण्याची मूर्तमेढ राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्यकर्तुत्वातून उभी केली होती.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म देखील आजच्या दिवशी १८६३ साली कलकत्ता येथे झाला. स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीला आध्यात्मिक बैठक,अध्यात्मिक शक्ती आणि विचारधारा प्राप्त करून दिली. स्वामी विवेकानंदांना आयुष्य जेमतेम चाळीस वर्षाचेच मिळाले. पण या अल्पशा काळामध्ये ते प्रथम शाळा कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी,त्यांचे महान गुरु श्री रामकृष्ण यांचे अत्युत्तम शिष्य,संबंध भारत उभा आडवा हिंडून पाहिलेले परीव्रजक आणि शेवटी पूर्व पश्चिम महान अध्यात्मिक गुरु असे उत्तुंग जीवन ते जगले.११ सप्टेंबर १८९३ च्या जागतिक सर्वधर्म परिषदेतील पहिल्या व्याख्यानाने त्यांनी आपल्या प्रचार कार्याची सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांचे आपल्या मातृभूमीवर अपार प्रेम होते. ते एका ठिकाणी लिहितात,'भारतीय समाज हा माझा लहानपणीचा पाळणा आहे.तरुणपणीची फुलबाग आहे आणि वार्धक्याची काशी आहे. भारत माता माझा सर्वश्रेष्ठ स्वर्ग आहे. भारताचे कल्याण हेच माझे कल्याण आहे.' स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक बनण्याचा आजच्या युवकांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या मते - युवकांच्या चेहऱ्यावर तेज असावे. देहामध्ये शक्ती असावी. मनामध्ये उत्साह असावा. बुद्धीमध्ये विवेक असावा.हृदयामध्ये करुणा असावी. मातृभूमीवर प्रेम असावे. इंद्रियांवर संयम असावा. मन त्यांचे स्थिर असावे. आत्मविश्वास दृढ असावा.इच्छाशक्ती प्रबळ असावी. धाडसाचे त्यांच्या अंगात बळ असावे. सिंहासारखा तो निर्भय असावा.ध्येय त्यांचे उच्च असावे. सत्य त्यांचा ईश्वर असावा. व्यसनापासून तो मुक्त असावा.जीवनामध्ये त्यांच्या शिस्त असावी.प्रेमळ त्यांचा सूर असावा. मानवता हेच त्यांचे कुळ असावे. गुरुजनांचा आदर आणि पालकांवरती त्यांची श्रद्धा असावी. दीनदुबळ्यांचा तो मित्र असावा. सेवेसाठी तो तत्पर असावा.देवावरती त्यांची भक्ती असावी. जीवनामध्ये त्याचा नीती असावी.चारित्र्य त्यांचे शुद्ध असावे. असे 'सशक्त, उत्साही, श्रद्धावान व निष्कपट शंभर तरुण मिळाले तर जगात क्रांती घडवून येईल. असे ते म्हणायचे. भगिनी निवेदिता यांच्या मते,'स्वामी विवेकानंद हे भारताच्या अध्यात्मिकतेचे,पावित्र्याचे,ज् ञानाचे, सामर्थ्याचे,दूरदृष्टीचे आणि विधीलिखिताचे प्रतीक होते.' 'तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांचा अभ्यास करा !' असे रवींद्रनाथ टागोर म्हणायचे.
अशा या दोन संस्कारपीठामधून संस्कारमूल्ये आपण घेतली पाहिजेत.
- किशोर जाधव,सोलापूर
- मो. नं. ९९२२८८२५४१
0 Comments