जड वाहतूक नियंत्रण न झाल्यास आक्रमक आंदोलन करू
- कॉ. आडम मास्तर यांचा इशारा.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-वाढते शहरीकरण व नागरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्या व वाहनांची संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांची वर्दळ व अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण व अपघाती मृत्यूचे प्रमाण हे देखील वाढलेले आहे. हे नियंत्रित आणण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन कार्यरत आहे. परंतु वाहतूक नियंत्रणाच्या नियमांचे व आदेशाचे पालन होत नसल्याने शहरात अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण यात घट होताना दिसत नाही. बेजबाबदार अनियंत्रित माल वाहतुकीमुळे ६ वर्षीय साक्षी कलबुर्गी दगावली. याला कारणीभूत कोण? शहरा अंतर्गत जडवाहतूक पूर्णपणे बंद करून शांती चौक ते गुरुनानक चौक या मार्गाला पर्यायी मार्ग द्यावे, या मार्गावर एक्सप्रेस हायवेप्रमाणे गतिरोधक बसवावे, बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावे, वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनांच्या वेगाची तपासणी व्हावी. यासाठी संबंधित राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून शहरातील अपघात व अपघाती मृत्यूवर आळा घालावे व नागरिकांना संरक्षण द्यावे. असे न झाल्यास एक महिन्यानंतर नागरिकांच्या पुढाकाराने अनियंत्रित जडवाहतूक व मालवाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल. असा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला.
सोमवार दि. २० जानेवारी २०२५ रोजी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर)यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मा. व पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड एम.एच.शेख, कॉ. नसीमा शेख, कॉ. शेवंताताई देशमुख, कॉ. सुनंदा बल्ला, ॲड. कॉ. अनिल वासम, कॉ. विल्यम ससाणे आदींचा समावेश होता.
सदर निवेदनात अशी मागणी केली कि, मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. त्याची सखोल चौकशी व तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व शासनाकडून मयताच्या कुटुंबीयास २५ लाख रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी.
0 Comments