Hot Posts

6/recent/ticker-posts

एनटीपीसी प्रकल्प: सोलापूरच्या पर्यावरणाला सुरक्षित, विमानतळासाठी अडथळामुक्त

 एनटीपीसी प्रकल्प: सोलापूरच्या पर्यावरणाला सुरक्षित, विमानतळासाठी अडथळामुक्त



सोलापूर विकास मंचच्या औद्योगिक दौऱ्यात महत्त्वपूर्ण माहिती उघड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी एनटीपीसी सोलापूर प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या चिमणीमधून प्राणघातक रसायन हवेत सोडले जात नाही; फक्त पाण्याचा वाफ बाहेर पडतो. यामुळे सोलापूरच्या पर्यावरणीय तापमानावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. एन.टि.पी.सी. सोलापूर प्रकल्पातुन तयार होणारी वीज पाच राज्यांत पॉवर ग्रीड च्या माध्यमातून वितरीत होते ज्याचा अर्धा वाटा महाराष्ट्र राज्य आणि अर्धा इतर राज्यांना पुरवठा होतो. 

एनटीपीसी सोलापूर प्रकल्प राष्ट्रीय धरोहर असून, महत्त्वाचा वीज निर्मिती प्रकल्प आहे जो स्थानिक समुदायांना ऊर्जा पुरवतो. या प्रकल्पाने पर्यावरण संवर्धनाच्या वचनबद्धतेतून दरवर्षी ५०,००० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. आजपर्यंत पाच लाखांहून अधिक झाडे लावली गेली असून त्यातील ८० टक्के झाडे जगली आहेत, हा उल्लेखनीय यशाचा दाखला आहे.

प्रकल्पाच्या चिमणीबाबत सोलापूर विमानतळाच्या विकासासाठी कोणतीही अडचण नाही, कारण सर्व परवानग्या डीजीसीए व एएआयकडून घेतल्या असल्याची माहिती प्राप्त झाली. सोलापूर विकास मंचने या औद्योगिक दौऱ्यादरम्यान एनटीपीसीच्या कार्यपद्धतीबाबत सखोल माहिती मिळवली, ट्रबाईन आणि नियंत्रण कक्षाची पाहणी देखील मंचच्या सदस्यांनी केली. या दौऱ्याचे आयोजन तरुणाईला प्रेरणा आणि सोलापूरकरांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आले होते. मंचाने यापूर्वीही प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला भेट दिली असून, भविष्यातही विविध उद्योगांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.

दौऱ्यादरम्यान एनटीपीसी सोलापूर प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंडोपाध्याय, नवीन कुमार अरोडा (महाप्रबंधक अनुरक्षण), बिपुल कुमार मुखोपाध्याय (महाप्रबंधक, ऑपरेशन्स), मनोरंजन सारंगी (महाप्रबंधक एचआर), कविता गोयल (डीजीएम एचआर), विजयकुमार कोनापरेड्डी (एचआर) आणि लबीब अख्तर (एचआर) यांसह सर्व विभाग प्रमुखांनी सदस्यांचे स्वागत केले.

सोलापूर विकास मंचच्या केतन शहा, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, अमृता अकलुजकर, महेश हणमे, प्रशांत भोसले, अक्षय फडके, प्रसन्न नझारे, राहुल होनकळस, अॅड. दत्तात्रय अंबुरे आदी सदस्यांची उपस्थिती होती. सोलापूर विकास मंचाच्या या दौऱ्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सोलापूरच्या तरुणांना नवीन प्रेरणा मिळण्यास मदत होईल, अशी आशा आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments