वैराग शहराजवळ दिसली बिबट्याची तीन पिल्ले
आधी वाघ मग बिबट्या, तरस आणि आता बिबट्यांची पिल्ले वाघ शोध मोहिमेत ड्रोनचा वापर सुरू, अद्याप लोकेशन नाही
वैराग (कटूसत्य वृत्त) :-
वाघ आणि बिबट्याने बार्शी तालुक्यात उच्छाद मांडलेला असतानाच वैराग शहराजवळ दोन शेतकऱ्यांसह दोन मजूर महिलांना शेतात चक्क बिबट्याची तीन पिल्ली आढळून आली आहेत. घटनास्थळी अद्याप वन विभागाने भेट दिलेली नाही मात्र ती वन मांजरांची पिल्ली असू शकतात? असा अंदाज व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष पाहणाऱ्या चौघांनी आम्ही बिबट्याचीच पिल्ली पाहिल्याचा दावा केला आहे. दरम्यान, वाघ शोध मोहिमेच्या सहाव्या दिवशी वाघाचे करंट लोकेशन वन विभागाला मिळू शकलेले नाही. आता शोध मोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून ड्रोनचा देखील वापर सुरू करण्यात आला आहे.
वैराग शहराजवळ बाळासाहेब खेंदाड आणि आप्पासाहेब खेंदाड यांची शेत जमीन आहे. दोघेही शेतामध्ये कांदा काढणी सुरू असल्याने एकत्रच होते. दरम्यान, कांदा काढणी शेजारी गव्हाचे पीक देखील आहे. या गव्हाच्या खालच्या बाजूने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन पिल्ली आल्याचे बाळासाहेब खंदाड यांनी पाहिले. दरम्यान, त्या पिल्लांचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करावे यासाठी त्याच्यामागे ते धावले मात्र बिबट्या त्यांच्या मागे असेल म्हणून पुन्हा मागे फिरले. या धावपळीत त्यांच्यासोबत असलेल्या बाळासाहेब खेंदाड यांनी देखील पिल्लांना पाहिले तर कांदा काढणीसाठी आलेल्या दोन महिलांनी देखील या पिल्लांना गव्हातून ज्वारीच्या शेताकडे पळत जाताना पाहिले. या घटनेच्या साक्षीदार दोन पुरुषांसह दोन महिला ठरल्या आहेत. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. मात्र, सध्या वनविभाग
वाघ पकडण्याच्या घाईगडबडीत असल्यामुळे त्यांना तात्काळ घटनास्थळी येता आले नाही.
त्यांना याची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी रान मांजरांची पिल्ली असू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मागील गुरुवारी अमोल भोसले यांच्या शेतामध्ये रेडकाची शिकार बिबट्याने केली होती. हे ठिकाण खेंदाड यांच्या शेतापासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे वाघ गेला असला तरी बिबट्याची दहशत कायम होती. आता
त्यामध्ये या पिल्लांची आणखी भर पडली आहे.
उक्कडगाव (ता. बार्शी) शिवारातील पठाडे तलावाजवळ तीन जनावरांवर हल्ला केल्यानंतर वाघाने कडकनाथवाडी येथे मुक्काम ठोकून भूम हद्दीत प्रवेश केल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. वाघाचा शोध घेण्यासाठी ताडोबा रेस्क्यू टीम आणि वनविभागाने शोध मोहीम
तीव्र केली आहे. ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर वाघाचा मागोवा घेण्यासाठी येडशी अभयारण्य, उक्कडगाव, टेंबरवाडी तलाव परिसरात ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू आहे. शनिवारी कडकनाथवाडी (ता. वाशी) परिसरात वाघाचे ठसे आढळून आले असून वाघ भूमच्या दिशेने गेला असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. भूम वनविभागाने यासाठी विशेष सतर्कता घेतली आहे.
0 Comments