लोकमंगल कृषी महाविद्यालया तर्फे व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील पदवीच्या अंतिम वर्षासाठी असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमांतर्गत मौजे काटी ता.तुळजापूर येथे माती आणि पाणी परीक्षण या विषयावर दिनांक ३० डिसेंबर रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लोकमंगल कृषी महाविद्यालयातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. बाबाजी शिरसाट हे लाभले होते. या व्याख्यानासाठी ग्रामदैवत दत्त मंदिर, दत्त चौक काटी येथे सर्व शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शिवली. सदरील कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकरी बांधवांमध्ये माती व पाणी याच्या परीक्षणाबाबत जनजागृती करणे आणि त्याकरिता प्रवृत्त करणे हा होता. आपल्या व्याख्यानामध्ये प्रा. शिरसाट यांनी सुधारित शेती बरोबरच मातीचे आरोग्य, मातीची सुपीकता, पाण्याची गुणवत्ता या सर्व बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्याकरिता माती परीक्षण हा एक अविभाज्य घटक आहे असे मत यावेळी व्यक्त केले. जमिनीचे माती परीक्षण न केल्यास उद्भवणाऱ्या अडचणी, खतांवरचा वारेमाप खर्च आणि गुणवत्तेच्या निकषात न बसणारे उत्पादने इत्यादी गोष्टी टाळण्याकरिता मातीतील मूलद्रव्यांची तपासणी नियमित स्वरूपात शेतकऱ्यांनी करावी असे त्यांनी आवाहन केले. शास्त्रोक्त पद्धतीने माती व पाण्याचा नमुना कसा घ्यावा याबाबत अतिशय तांत्रिक व सखोल माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. या समवेत माती पाणी परीक्षणामुळे होणाऱ्या विविध फायद्यांची आणि महत्त्वाच्या मूलद्रव्यांची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली. सर्व शेतकरी बांधवांनी सदरील विषयासंदर्भात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे चर्चासत्राच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेतली. या व्याख्यानाचे आयोजन लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदरील व्याख्यानाच्या आयोजन व संपन्नतेसाठी अक्षय पडणुरे, भूषण शेंडे, श्रेयस पाटील, सागर ठवरे, आदित्य साठे, सौरभ वनवे आणि गौरव ननवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments