Hot Posts

6/recent/ticker-posts

सावित्रीमाई फुले यांचे कार्य अभिमानास्पद!

 सावित्रीमाई फुले यांचे कार्य अभिमानास्पद!



भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. वडील खंडोजी नेवसे पाटील, आई लक्ष्मीबाई आणि सिंधुजी, सखाराम व श्रीपती या तीन भावंडांसह सावित्रीबाईंचे बालपण आनंदात व्यतीत झाले. त्यांचा विवाह १८४० मध्ये जोतीराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला.
पिता रक्षति कौमारे,भर्ता रक्षति यौवने  
रक्षन्ति स्थविरे पुत्रा,न स्त्री स्वातन्त्र्यं मर्हति|
 असे म्हणत मनूने स्त्रियांना जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत स्वतंत्र देऊ नये असा दंडकच घालून दिला होता. अशी बंधने महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात तोडण्याचे काम केले.
   स्त्री सक्षमतेचे प्रभावी साधन म्हणजे त्यांना शिक्षणाची संधी देणे हे महात्मा फुले यांनी जाणले होते. शिक्षण सर्वांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे; कारण शिक्षणामधून आपल्यातल्या सुप्त क्षमता विकसित करण्याची संधी मिळते, हे त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून सिद्ध केले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या मधील सुप्त क्षमता विकसित झाल्या आणि त्या आदर्श शिक्षिका, प्रतिभावंत कवित्री,लेखिका समाजसुधारका म्हणून पुढे आल्या.१ जानेवारी १८४८ रोजी जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी वयाच्या १७ व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन ज्ञानदानाचे कार्य केले.त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या.सावित्रीबाईंवर ‘धर्मबुडवी’ म्हणून सनातनी लोक शेणमाती फेकू लागले. तरीसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. सर्व विरोधाला धैर्याने तोंड देत त्यांनी आपली आगेकूच चालूच ठेवली.पुढे सावित्रीबाईंसह सगुणाबाई क्षीरसागर आणि फातिमा शेख यांनीही या मुलींच्या शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम केले. 
       राधां,वाढा, उष्टी काढा... ' असे स्त्रियांना सांगणाऱ्या निकृष्ट समाज व्यवस्थेवर फुले दांपत्यांनी प्रहार केले. स्त्रिया शिकल्या तर विधवा होतील, ही त्या काळातील समजूत त्यांनी खोटी ठरवली. 'ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही,बुद्धी असुनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का ?' असा रोकडा सवाल त्या काळी सावित्रीबाईंनी आपल्या काव्यातून समस्त समाजाला विचारला होता.
    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले फक्त शाळा काढून थांबले नाहीत. अस्पृश्यतेवर त्यांनी हल्ला चढवला. सती व केशवपणाला त्यांनी विरोध केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या राहत्या घरी फुले वाड्यात १८६३ साली 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. त्यातल्याच एका काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले. या यशवंतला त्यांनी डॉक्टर केले. पुढे त्यालाच आपल्या सर्व संपत्तीचे वारसदार ठरवले. 
     विधवांना केशवपण करून विद्रूप केले जाई. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अनुयायी व पहिले भारतातील कामगार नेते सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांनी या विरोधात नाभीकांचा संप घडवून आणला. या संपाला आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनीही मदत केली.या संपाची दखल लंडनच्या वृत्तपत्रांनी घेतली होती.
विधवा पुनर्विवाला चालना देणारी सभा सावित्रीबाईंनी काढली.दुष्काळात ब्रिटिश सरकारला रिलीफ कार्य करायला भाग पाडले. १८९७ मध्ये प्लेगणे सर्वत्र हौदास घातला असताना हॉस्पिटल चालवून शेकडो रुग्णांची सावित्रीबाईंनी स्वतः सुश्रुषा केली. रुग्णांची सेवा करता करता सावित्रीबाई प्लेगणे पछाडल्या गेल्या. त्यातच त्यांना १० मार्च १८९७ या दिवशी लोकसेवा करता करता मृत्यू आला.
    जोतीरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. १८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. सावित्रीबाईंच्या ‘काव्यफुले’ (१८५४) हा काव्यसंग्रह लिहिला. या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. त्या स्थूलमानाने निसर्गविषयक, सामाजिक, आत्मपर, बोधपर आणि इतिहासविषयक अशा आहेत.सावित्रीबाईंचा दुसरा कवितासंग्रह ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ (१८९२) म्हणजे जोतीरावांचे काव्यमय असे आद्यचरित्रच होय.
    सावित्रीबाईंवर आजवर जवळपास ४० छोटीमोठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काही कवितांचा इंग्रजीत अनुवादही झाला आहे. सुषमा देशपांडे यांनी ‘व्हय मी सावित्रीबाई!’ या मराठी एकपात्री नाटकाचे प्रयोग भारतभर केले आहेत. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या कार्याचे क्रांतिकारी स्वरूप लक्षात घेऊन त्यांना ‘क्रांतिज्योती’ ही उपाधी दिली गेली. तसेच ९ ऑगस्ट २०१४ या दिवशी पुणे विद्यापीठाचे नामकरण ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले. १४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
    अशा प्रकारे सावित्रीबाईंचे सारे चरित्र अत्यंत तेजस्वी आणि स्फूर्तीदायक आहे. अडचणीच्या वेळी मार्गदर्शन करणारे आहे.सावित्रीबाई फुले यांनी 'न भूतो न भविष्यति', अशी सामाजिक क्रांती घडवून आणली. सावित्रीबाई म्हणजेच सामाजिक क्रांतीचा एक झरा होय. या झऱ्यास पुढील काळात अनेक नाले,ओढे मिळाले. या क्रांतीचा इतिहास लिहिताना प्रथम सावित्रीबाईंचाच नामनिर्देश करावा लागतो.सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या, अस्पृश्यता निवारण आणि मानव सेवा या बाबतीत महाराष्ट्रामध्ये केलेले कार्य कोणालाही अभिमानास्पद वाटेल असेच आहे.
 -किशोर जाधव, सोलापूर
मो. नं. ९९२२८८२५४१

Reactions

Post a Comment

0 Comments