पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराप्रमाणे शिर्डी साईबाबांच्या दर्शनाची वेळ व पुजा सुरू करा
जलसंपदामंत्री मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याकडे दत्तात्रय बडवे-शिंदे यांची मागणी
पंढरपूर-(कटुसत्य वृत्त) :-
नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डी येणाऱ्या भाविकांच्या सोयीच्या नावाखाली 1 जानेवारी 2025 रोजी साईबाबांची शेजारती व काकडारती 1 दिवस बंद ठेवण्यात आली त्यामुळे साईबाबांचे नित्योपचार झाले नाही त्यामुळे आमच्यासह अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा विचार केल्यास नित्योपचार बंद ठेवल्यानंतर पौर्णिमेला प्रक्षाळपुजा करून पुन्हा नित्योपचार सुरू केले जातात मात्र शिर्डीमध्ये असे कुठेही आढळून आले नाही. माघ वारी व चैत्री वारीत मंदिर रात्री 1 वाजता बंद होते व रात्री 3 वाजता उघडतात या धर्तीवर शिर्डीमध्ये गर्दी असल्यावर निर्णय घेण्यात यावा. तसेच विठ्ठलाला समोरील बाजू आहे पण शिर्डी साईबाबांच्या समाधीला दोन्ही बाजू आहेत त्या एका बाजूचा धर्मदर्शन चालू ठेवून दुसऱ्या बाजूने पंढरपूरप्रमाणे देवापुढे उभे राहून यजमान यांची तुळशीपूजा, अभिषेक पुजा, वस्त्र महापुजा, अलंकार महापुजा असे विविध पुजेचे प्रकार करून त्यांना कर लावून त्या समाधीच्या दुसऱ्या बाजूचा या कारणासाठी उपयोग करून साई संस्थानचे उत्पन्न वाढवावे व भाविकांना पुजेची संधी देण्यात यावी. अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अ.भा.शुक्ल यजुर्वेदी कण्व प्रथम शाखेचे पंढरपूरचे माजी शहराध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी पंढरपूर येथे आल्यानंतर निवेदन देवून केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे पहाटे 4 वाजता काकडारती सुरू असते त्यावेळी मुखदर्शन सुरू केले जाते व पायाचे सकाळी 6 वाजता सुरू होते ते रात्री 10.45 बंद करण्यात येते. त्याप्रमाणे साईबाबांचे सकाळी 4 वाजता दर्शनासाठी दरवाजा उघडण्यात यावा व एका बाजूने मुखदर्शन चालू करावे व दुसऱ्या बाजूने काकडारती करण्यात यावी. पंढरपूरप्रमाणेच रात्री 10.45 वाजता दर्शन बंद करण्यात यावे. तसेच पंढरपूरला श्री विठ्ठल रूक्मिणी माता हे रात्री शेजारती नंतर झोपण्यासाठी शयनगृहात जातात त्यासाठी पायघड्या घातल्या जातात त्या धर्तीवर साईबाबांच्या समाधीच्या दक्षिण-उत्तर बाजूपैकी एक खोलीमध्ये विठ्ठलाप्रमाणे साईबाबांसाठी शयनगृह बांधण्यात यावे व शयनगृहामध्ये साईबाबांसाठी सोन्यांचा पलंग करण्यात यावा व विठ्ठलाप्रमाणेच साईबाबांना पायघड्या घालून बाबांना झोपविण्यात यावे. साईबाबांच्या काकडरती, धुपारती, शेजारतीमध्ये फक्त साईनाथांच्याच आरत्या ठेवण्यात याव्यात इतर साधू संतांच्या आरत्या म्हणू नयेत. विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या आरतीशिवाय इतर साधू संतांच्या आरत्या म्हणल्या जात नाहीत याचा विचार व्हावा. तसेच साईनाथांच्या समाधीच्या एका बाजूने भाविकांच्या पुजा सुरू करण्यात याव्यात व इथुन पुढे साईबाबांचे काकडारती व शेजारती बंद ठेवू नये अशी ही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, मा.अर्थमंत्री ना.अजित पवार व मा.अध्यक्ष / कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांना पाठविण्यात आली आहे.
0 Comments