लोकमंगल कृषी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, इतर सन्माननीय प्राध्यापक वृंद व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सर्वप्रथम जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. स्वराज्यसंकल्पक छत्रपती शहाजी महाराज यांच्या पत्नी आणि रयतेचे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, प्रेरणास्थान, गुरू म्हणजेच जिजाऊ अर्थात राजमाता जिजाबाई भोसले होय. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून परकीया विरुद्ध मराठी आत्मसन्मान जपण्यासाठी उभे केले. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती या अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या सोबत सोन्याचा नांगर चालवून शेतजमीन नांगरली व नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच राजनीतीही शिकविली तसेच समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी दिले.
भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते.भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामी विवेकानंद यांनी केला आणि तो आयुष्यभर आपल्या कार्यकर्तृत्वाने पूर्ण देखील केला. विद्यार्थ्यांनी अशा या थोर व्यक्तिमत्त्वाकडून सकारात्मक प्रेरणा घेऊन आपला आणि भारतभूमीचा उत्कर्ष साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदरील कार्यक्रमासाठी प्रा. सुजाता चौगुले, प्रा. नवनाथ गोसावी, प्रा. ज्ञानसागर सुतार, प्रा.बाबाजी शिरसाट, प्रा. अजिंक्य ढोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
0 Comments