फसवणूक, घरफोडीप्रकरणी एकाला अटक; पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- मंगळसुत्राच्या बदल्यात जास्तीचे सोने देतो, म्हणून मोहोळ शहरात महिलेची फसवणूक करून गळ्यातील अर्धा तोळयाचे मंगळसूत्र पळवून नेले होते. तर आष्टीच्या घरफोडी प्रकरणातील ३ लाख ५० हजार रुपये चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात मोहोळ पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.दोन्ही गुन्ह्यातील मिळून पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटील हॉस्पीटल जवळ येथे दि. ५ जानेवारीरोजी रंजना अशोक खांडेकर (रा. शिरापूर, सो. ता. मोहोळ) यांना अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या बदल्यात जास्तीचे सोने देतो, असे सांगून त्यांची फसवणूक करून गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र घेऊन पळून गेले होते. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. दयानंद हेंबाडे करत होते. त्यांनी अभिमान बापू तुपे (रा.पिटी, ता. पाटोदा, जि. बीड) याचा शोध घेऊन त्यास पकडून त्याच्याकडून ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून त्याला अटक केली.
तसेच दि. १३ जानेवारी २०२५ रोजी तालुक्यातील आष्टी गावातील संगिता दत्तात्रय माने यांच्या घराचे कुलुप तोडून ३ लाख ५० हजार रूपयांची चोरीची घटना घडली होती. या गुन्हयाचा तपास पो.हे.कॉ. दयानंद हेंबाडे करत होते. धीरज कैलास गुंड (रा. आष्टी ता. मोहोळ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची ३ लाख ४५ हजारांची रोख रक्कम जप्त केली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरिक्षक अजय केसरकर, गुन्हे शाखेच्या पथकातील पो.हे.कॉ. दयानंद हेंबाडे, पो.हे.कॉ. संदेश पवार, पो.ना. चंद्रकांत ढवळे, पो.कों. अमोल जगताप, संदीप सावंत, अविराज राठोड, स्वप्नील कुबेर, सुनिल पवार, पो.हे.कॉ. पठाडे व सायबर सेलचे युसूफ पठाण यांनी केली.
0 Comments