सिद्धेश्वर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी वाहतूक मार्गासंबंधी आदेश काढले आहेत. त्यानुसार १२ ते १६ जानेवारी दरम्यान नंदीध्वज मार्गावर आणि श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर व बाजार परिसरात 'नो पार्किंग झोन' असणार आहे. होम मैदानावर १४ जानेवारीला होम विधी सोहळा तर १५ जानेवारीला शोभेचे दारूकाम होईल. त्यावेळी हा आदेश लागू असणार आहे. या काळात वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहे.
दरम्यान, १२ ते १६ जानेवारी दरम्यान हा आदेश लागू असणार आहे. यात्रा कालावधीत पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याचेही आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, होम मैदान याठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात. श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरातही भाविकांची मोठी गर्दी असते. महापालिकेने या परिसरात जनावरांच्या बाजाराला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या हेतूने वाहने रोडवर पार्किंग करण्यास बंदी घातली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येतील, असा अंदाज पोलिस आयुक्तालयाने व्यक्त केला आहे.
हा असेल नंदीध्वज मिरवणूक मार्ग
हिरेहब्बू मठातून मिरवणुकीस सुरवात होणार असून, तेथून बाबा कादरी मशीद, डॉ. चिडगुपकर यांचे घर, केळकर वकील यांचे घर, दाते यांचे गणपती मंदिर, हाजीमाई चौक, खाटीक मशीद, कसबा चौक, माणिक चौक, विजापूर वेस, वडतिले यांचे दुकान, घिसाड गल्ली, पंचकट्टा, रिपन हॉलवरून श्री सिद्धेश्वर मंदिर (संमती कट्टा) असा नंदीध्वज मिरवणुकीचा मार्ग आहे. नंदीध्वज ६८ लिंग प्रदक्षिणा देखील असते. त्यामुळे मिरवणुकी वेळी अत्यावश्यक वाहने वगळता अन्य कोणत्याही वाहनाला प्रवेश असणार नाही.
विजापूर वेस ते पंचकट्टा आणि लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा या मार्गावरील वाहतूक विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकीमार्गे जाईल. भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पंचकट्टा या मार्गावरील वाहतूक पूनम चौक ते बेगमपेठ पोलिस चौकी मार्गे पुढे जाईल. भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पार्क चौक या मार्गावरील वाहतूक पूनम चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तसेच मार्केट पोलिस चौकी ते पंचकट्टा, पार्क चौक ते मार्केट चौकी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते फडकुले सभागृह हे मार्ग निर्बंध काळात वाहतुकीसाठी बंद राहतील, असेही पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी आदेशात नमूद केले आहे.
0 Comments