आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली
ग्रामीण रुग्णालयाची झाडाझडती
उपचाराबाबत रुग्णांशी साधला संवादअक्कलकोट, (कटुसत्य वृत्त):-
ग्रामीण रुग्णालयातील असुविधा, रुग्णांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी दुपारी अचानकपणे ग्रामीण रुग्णालयाला भेट देत झाडाझडती घेतली. आमदार कल्याणशेट्टी यांच्या या दौऱ्याने डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. सकाळी एका रुग्णाच्या नातेवाइकाने आमदार कल्याणशेट्टी यांना फोन केला होता. त्यानंतर आमदार कल्याणशेट्टी यांनी साडेबाराच्या सुमारास अचानकपणे रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सेवा आणि सुविधांची पाहणी करत उपचारात हलगर्जीपणा तसेच हयगय करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला. ओपीडी, सिजरिंग विभाग तसेच प्रत्यक्ष खाटाजवळ जाऊन थेट रुग्णांना भेटून उपचार मिळतात की नाही याबाबत चौकशी आणि विचारणा केली. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. सकाळी, संध्याकाळी कोणते डॉक्टर असतात. ते कधी आले याची माहिती मला कळवा, बायोमेट्रिक बंद अवस्थेत आहे ते का बंद आहे. तत्काळ सुरू करा,
उपचाराविना रुग्ण परत जाता कामा नये, गैरसोय थांबवा, सर्वांनी खबरदारी घ्या, यापुढे एकही तक्रार खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. येत्या दोन दिवसात रुग्णालय सल्लागार समितीची बैठक वोलवा आणि कर्मचारी व अधिकारी यांची संयुक्तिक वैठक लावा, अशा सूचना करत रुग्णालयातील गैरसोय आणि हलगर्जीपणा सहन केला जाणार
नाही, असा इशारा त्यांनी दिला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांच्याकडे दोन ठिकाणचा पदभार आहे. कुठेतरी एका ठिकाणी हा पदभार राहावा तरच स्वतंत्रपणे कामकाज व्यवस्थित होऊ शकते. याठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नेमावेत, अशी मागणी
ग्रामीण रुग्णालय सल्लागार समितीचे सदस्य अविनाश मडिखांवे यांनी केली.
आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णालयाला भेट देताच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, वैद्यकीय अधिकारी रवींद्र बनसोडे, डॉ. निखिल क्षीरसागर, डॉ. सतीश बिराजदार यांनी सर्व विभागाची त्यांना माहिती दिली. शासकीय स्तरावर कोणते विषय प्रलंबित आहेत. अक्कलकोट ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी आणखी किती डॉक्टर हवेत, कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, सध्या किती डॉक्टर येतात ते जागेवर असतात का याबाबतची माहिती घेतली आणि उर्वरित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, प्रकाश पाटील, प्रवीण देशमुख यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments