बार्शी (कटूसत्य वृत्त):- वृक्ष संवर्धन बार्शी च्या दररोज चालणाऱ्या अखंडीत श्रमदानास आज दोन हजार दिवस पूर्ण झाले. साडेपाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समितीचे श्रमदान दररोज सकाळी सहा ते आठ यादरम्यान चालते. 5 जून 2019 पासून सुरू झालेले हे कार्य आजपर्यंत अखंडित सुरू आहे. या पाच वर्षात वृक्ष संवर्धन समिती मार्फत बार्शी शहर व परिसरात जवळजवळ पंचवीस हजार वृक्ष लागवड करून ती संवर्धित करण्यात आली आहे. उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा एकही दिवस खंड न पडता वृक्ष संवर्धन समितीचे कार्य सुरू आहे. करोणा सारख्या महामारीत देखील हे कार्य सर्व नियम पाळून अखंडीत सुरू होते. दररोज च्या या श्रमदानात वृक्ष लागवड करणे, लावलेल्या झाडांना आळी करणे,पाणी देणे,काळी माती टाकने,खत टाकने, वाकलेल्या झाडांना सरळ करणे,त्याची योग्य कटाई करणे,परिसर स्वच्छता करणे आदी कार्य केले जाते. या पाच वर्षात वृक्ष संवर्धन समिती ने शहरातील अनेक मोठे रस्ते, अंतर्गत रस्ते,ओपन स्पेस, शासकीय कार्यालय, विविध शाळा,स्मशानभूमी,मंदिर परिसर,आदी ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्षांचे संवर्धन केले आहे. वृक्ष संवर्धन समितीची दुर्मिळ वृक्षांची नर्सरी देखील आहे. यामध्ये दुर्मिळ वृक्षांच्या बिया गोळा करून त्याची रोपे बनवली जातात व नंतर ती योग्य ठिकाणी लावली जातात. वृक्ष संवर्धन समितीमार्फत शहरात दोन ठिकाणी दुर्मिळ वृक्षांचे उद्यान देखील उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध जातीची देशी आणि दुर्मिळ होत असलेली झाडे लावून ती संवर्धित केली जात आहेत. अशी माहिती वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी दिली. अशा या अखंडित आणि अविरत श्रमदानाचा 2000 वा दिवस आज शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी कॅन्सर तज्ञ डॉ. राहुल मांजरे,प्रा. शशिकांत धोत्रे, हेल्थ क्लबचे भगवान लोकरे, पवन कुमार देशमुख, मदन देगावकर,संतोष घावटे हे उपस्थित होते. यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य तसेच हेल्थ क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments