सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रस्ते अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याचा विषय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गांभीर्याने मनावर घेतला आहे. सध्या ग्रामीण भागातील १३ अपघातप्रवण ठिकाणांची माहिती अधिकारी जागेवर जाऊन संकलित करीत आहेत.
त्या ठिकाणी नेमके सतत अपघात का होतात, यासह पोलिसांत दाखल फिर्यादीतील माहितीनुसार अपघाताचे नेमके कारण काय, याची माहिती घेऊन त्याचा अहवाल १० डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यावर ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत.
राज्यातील सर्वाधिक रस्ते अपघाताच्या शहर-जिल्ह्यांत सोलापूर नेहमीच पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे. दरवर्षी सरासरी साडेचारशे ते पाचशे जणांचा सोलापूरच्या हद्दीत अपघाती मृत्यू होतोय, अशी आकडेवारी सांगते. हे प्रमाण कमी करण्यासाठी तथा पूर्णत: थांबावे यासाठी अपघातप्रवण ठिकाणांसह विविध मार्गांवर नेहमीच अपघात ज्या ठिकाणी होतात, याचाही अभ्यास केला जात आहे. त्या पथकाचा सर्व्हे सध्या सुरू झाला असून, त्यांच्या परिपूर्ण अहवालानंतर कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे, कोणत्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करायची, याशिवाय आणखी काय उपाययोजना करता येतील, जेणेकरून अपघात रोखले जातील, यावर १० डिसेंबरलाच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाय केले जाणार आहेत.
अपघात रोखण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर कायमस्वरूपी उपाय
जिल्ह्यातील महामार्गांवर ग्रामीण हद्दीत १३ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) आहेत. महामार्ग पोलिस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय), सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणांची पाहणी सध्या सुरू आहे. १० तारखेला त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर अपघात रोखण्यासाठी त्या ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाय केले जाणार आहेत.
- बाळासाहेब भरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर ग्रामीण
हेल्मेट सक्तीची सरसकट कारवाई तूर्तास नाही
दुचाकीस्वारासह आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्वच जिल्ह्यांमधील महामार्गांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पण, तूर्तास सरसकट कारवाई केली जाणार नाही. सुरवातीला दुचाकीस्वारांमध्ये जनजागृती करून पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती किंवा हेल्मेटचा वापर का गरजेचा आहे, यावर प्रबोधन केले जाणार आहे. साधारणत: जानेवारीनंतर सरसकट कारवाईला सुरवात होऊ शकते.
0 Comments