सोलापुरात बेकायदेशीर संपामुळे शेतकरी, बाजार समिती, व्यापाऱ्यांचे नुकसान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अचानक संप पुकारून शेतकऱ्यासह बाजार समितीचे नुकसान करणाऱ्या हमालांवर कारवाई करणार अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक तथा पणन विभागाचे सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी दिली.
बुधवारपासून गृहमंत्री अमित शहा यांच्या तथाकथित वक्तव्यावरून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी अचानक आंदोलन पुकारले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबाबत बाजार समिती येथील माथाडी कामगारांनी बुधवारी रात्री, गुरुवारी दिवसभर संप पुकारल्याने शेतकरी, बाजार समितीसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यानंतर शनिवारी बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर पुण्याहून सोलापुरात दाखल झाले. त्यांनी यावेळी माध्यमांना माहिती देताना सांगितले की बाजार समितीतील कुठल्याही घटकाला अचानक संप पुकारता येत नाही. यामुळे या बेकायदेशीर संपाबाबत हमालांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल व त्यानंतर पुढील कारवाई होईल.
शेतकरी, बाजार समितीचे कर्मचारी, व्यापाऱ्यांचे कर्मचाऱ्यांनी शेतमाल गाड्यांतून खाली उतरविला. त्यानंतर कांद्यासह इतर सर्व शेतमालांचा लिलाव करण्यात आले. मात्र, लिलाव झालेला माल पुन्हा गाड्यांमध्ये लोडिंग करण्यासाठी माथाडी कामगारांनी नकार दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पडून होता. तो माल शनिवारी लोडिंग करून बाहेर काढण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे हाल
बुधवारी हमालांनी अचानक संप पुकारल्यामुळे कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे फार हाल झाले. शेतकऱ्यांनी स्वतः कांदा गाडीतून उतरवला. यावेळी शेतकऱ्यांना हमालांकडून दमदाटी केल्याचा दावा केला जात आहे. हा उतरवलेला कांदा राखण करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकरी रात्रभर कांद्याजवळ बसून राहिले. दरवेळेस बाजारातील विविध घटक संप पुकारतात मात्र याचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो.
0 Comments