Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार भाकरी फिरवणार, पक्ष संघटनेत मोठे बदल, प्रदेशाध्यक्ष बदलणार?

 विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार भाकरी फिरवणार, पक्ष संघटनेत मोठे बदल, प्रदेशाध्यक्ष बदलणार?




मुंबई (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीत प्रचंड परिश्रम करूनही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वाट्याला अपयश आलं. राज्यभरात पवारांच्या पक्षाचे केवळ 10 उमेदवार विजयी झाले.


त्यामुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजी वातावरण आहे.

मात्र, आता पुन्हा एकदा पक्षाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार अॅक्शन मोडवर आले असून ते पक्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेतील पराभानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातअनेक बदल करण्याची मागणी जोर धरत आहे.

शरद पवार देखील याच विचारात आहेत. त्यामुळे आता पक्षातील युवक, युवती, अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्षांसह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसंच या संदर्भात राष्ट्रवादीतील नेत्यांची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्याचीही माहिती आहे.

ही बैठक नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार असून खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. या बैठकीला आमदार, खासदारांसह सर्व विभाग प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर पक्षात योग्य ते बदल करण्यात येणार असल्याच सांगितलं जात आहे.

त्यामुळे आता शरद पवार भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जात आहे. तर या बैठकीनंतर पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय पक्षाच्या कार्यकारिणीत बदल केल्यास राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम राहणार की त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाची वर्णी लागणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments