साडेतीन हजारावर गेलेला कांद्याचा सरासरी भाव आता तीन हजारांवर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कृषी उत्पन्न बाजार समितीत साडेतीन हजारावर गेलेला कांद्याचा सरासरी भाव आता तीन हजार रुपयांवर आला आहे. बुधवारी सोलापूर बाजार समितीत ४२४ गाड्या कांदा आवक झाली होती.
त्यातील पाच क्विंटल कांद्याला सहा हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. तर ३२ क्विंटल कांद्याला अवघा ५०० रुपयांचा दर मिळाल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, बीड, धाराशिव, नाशिक, पुणे येथून सोलापूर बाजार समितीत कांदा येत आहे. निर्यात सुरु असल्याने यंदा कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे, पण तो देखील शेतकऱ्यांना चार पैसे राहतील असा नाही ही वस्तुस्थिती आहे. बुधवारी सोलापूर बाजार समितीत ४२४ गाड्या कांदा आला होता. एकूण ८४ हजार ८७० पिशव्या कांद्यापैकी ४२ हजार ३९८ क्विंटल कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा भाव मिळाला.
बंगळूर बाजारात प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत दर होता. आता जानेवारीत कांद्याची आवक वाढेल, पण दर स्थिर राहतील असा विश्वास व्यापाऱ्यांना आहे. पावसाळ्यात सुरवातीला लावलेला कांदा खराब झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने कांदा लागवड केली आहे. तो कांदा आता जानेवारीत बाजारात येईल.
0 Comments