Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

 लोकमंगल कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी  महाविद्यालय वडाळा येथील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक १६ डिसेंबर ते १७ डिसेंबर  या कालावधीमध्ये दीक्षारंभ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. नवीन शिक्षण प्रणाली या अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्याकरिता दीक्षारंभ या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांना नामांकित संस्था तसेच कृषी आधारित कंपन्या या ठिकाणी शैक्षणिक भेटी देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संधी तसेच ज्या विद्यापीठाचा आपण एक घटक आहोत तेथील कार्यप्रणाली, संशोधन, शिक्षण, विस्तार, आणि आधुनिक कृषी  तंत्रज्ञान इत्यादी बाबी जाणून घेण्याकरिता या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे करण्यात आले होते. या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील कृषी माहिती व तंत्रज्ञान केंद्र, ग्रंथालय, गाई संशोधन केंद्र, बी प्रक्रिया केंद्र, फुले बेकरी, रोपवाटिका, कृषी अवजारे संग्रहालय, जलसिंचन उद्यान, स्वयंचलित हवामान केंद्र, कापूस सुधार प्रकल्प, औषधी वनस्पती संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, उद्यानविद्या डेमो प्रक्षेत्र, ड्रोन प्रयोगशाळा विभाग, शेळी व मेंढी सुधार प्रकल्प, जिवाणू खते उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालन विभाग आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान विभाग इत्यादी विविध विभागांना भेटी देऊन शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली. सदरील भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्रातील भविष्यातील सकारात्मक दृष्टिकोनाविषयी जागरूकता निर्माण झाली आणि कृषी उद्योजक घडण्याची पायाभरणी देखील या निमित्ताने झाली. सदरील शैक्षणिक भेटीकरिता प्रथम वर्षातील १०५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यात ७४ मुले व ३१ मुलींचा समावेश होता. सदरील शैक्षणिक सहली च्या आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष बापू देशमुख, अध्यक्ष श्री.रोहनजी देशमुख, सचिवा डॉ. अनिता ढोबळे यांचे प्रोत्साहन मिळाले. या शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या संपन्नतेसाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. संपूर्ण शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी प्रा.नवनाथ गोसावी,  प्रा. स्वाती खोबरे, डॉ. तेजश्री लाच्याण आणि प्रा. अजित कुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यापीठातील आणि संशोधन केंद्र परिसरातील सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चासत्र, प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अतुलनीय भर पाडण्याचे योगदान दिले. या त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. 


Reactions

Post a Comment

0 Comments